Kolhapur Crime : शेतकऱ्याकडे तब्बल एक एक कोटीची लाचेची मागणी करून पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या निलंबित पोलिस नाईकाच्या सांगलीतून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. जॉनविरोधात मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर आता लाच लूचपत विभागही त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. 


कोल्हापूर पोलिसमधून निलंबित करण्यात आलेल्या निलंबित पोलिस नाईक जॉन विलास तिवडे याने पुणे जिल्ह्यातील देहू रोड येथील शेतकऱ्याकडे  शेतजमिनीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी तब्बल एक कोटींची लाच मागितली होती. रकमेचा आकडा पाहून पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली होती.


जॉनला सांगली पोलिसांनी मिरजेतून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. तिवडे याने यापूर्वी सुद्धा खाकीला डाग लावण्याचे काम केले आहे. दोन वर्षांपूर्वी नात्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर तो फरारच होता. आज याच प्रकरणात सांगली पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या.


लाच मागितल्याप्रकरणी शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 


दरम्यान, शेतजमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी तक्रारदाराकडे 1 कोटी रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले होते. पोलीस नाईक जॉनविरोधात मागील आठवठ्यात कोल्हापूरच्या शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जॉन हा  जिल्हाधिकाऱ्यांचा निलंबित अंगरक्षक आहे.  


लाच मागितलेल्या तक्रारदाराचा शेतजमिनीवरून पुण्यात दावा सुरु आहे. या दाव्याचा निकाल प्रशासकीय सदस्य माजी जिल्हाधिकारी माने यांना सांगून तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्याचे सांगत विरुध्द पार्टींने एक कोटी देण्याची तयारी आहेय, तुम्हीही तयारी करा असे म्हणून लाचेची मागणी केली होती. 


त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर पथकाने केलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता शाहुपूरी पोलिसही त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.