Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपीसह व जादा 350 रुपये दिल्याशिवाय ऊसाच्या कांडाला हात लावू देणार नाही, असा सज्जड इशारा जयसिंगपूरमध्ये झालेल्या ऊस परिषदेत दिला होता. या मागणीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत शिरोळ तालुक्यातील तिन्ही कारखान्यांची ऊस वाहतूक बंद पाडण्यात आली आहे. 


शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त शुगर, घोडावत जॅगरी तसेच शिरगुप्पे शुगर कारखान्याची ऊस वाहतूक आतापर्यंत स्वाभिमानीने रोखली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऊस परिषदेत चालू गळीत हंगामात एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या ऊसाची एफआरपी अधिक 200 रुपये तातडीने जमा करावेत, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करा यासह स्वा13 ठराव मंजूर करण्यात आले होते. 


दत्तवाडमध्ये ऊस वाहतूक रोखली


शिरोळ तालुक्यातील दत्तवाडमध्ये गुरुदत्त शुगरकडून आज ऊसतोड करण्यात आली. यावेळी ऊसतोड करू नये अशी विनंती करूनही केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी ऊस घेऊन गुरुदत्त शुगरकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर हल्ला करून मोडतोड केली. कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरचे हेडलाईट फोडून टाकताना स्वाभिमानीने जाहीर केलेला दर कारखान्यांनी जाहीर केल्याशिवाय ऊस वाहतूक न करण्याचा इशारा दिला.


हेरवाडमध्येही ऊस वाहतूक रोखली 


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हेरवाडमध्येही घोडावत कारखान्याकडून होणारी ऊसतोड बंद पाडली होती. कार्यकर्त्यांनी एकरकमी एफआरपीसह व जादा 350 रुपये दिल्याशिवाय ऊसतोड करू देणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.


औरवाड फाट्याजवळ ट्रॅक्टर अडवला 


दोन दिवसांपूर्वी औरवाड फाट्याजवळही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घोडावत कारखान्याला जाणारा ऊस अडवला होता. दर देत नाही, तोवर गाडी जाऊ देणार नाही, अशा घोषणा देत ट्रॅक्टर अडवला होता. त्यापूर्वी, घोडावत कारखान्याचीच आळते (ता. हातकंणगले) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरची हवा सोडून देत ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोड करू नये, असा इशारा देत ऊस तोड बंद पाडली होती. 


डी. वाय. पाटील कारखान्याकडून पहिली उचल प्रतीटन 3 हजार जाहीर 


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्यकडून चालू हंगामात पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये दिली जाणार आहे. हसन मुश्रीफ यांनीही एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली आहे. मात्र, राजू शेट्टी यांनी घेतलेल्या भूमिकेवरून कारखानदार काय मार्ग काढणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. दुसरीकडे नोव्हेंबर पहिल्या आठलवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात गळीत हंगाम सुरु होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे स्वाभिमानीकडून आंदोलन तीव्र केलं जाण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या