Milk Rate Hike : गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुधाची वाढलेली मागणी आणि तुलनेत कमी होत असलेला पुरवठा यामध्ये मोठी तफावत होत चालली आहे. त्यामुळे दूध दरात आणखी दरवाढ अटळ आहे. या निर्माण झालेल्या तफावतीमुळे प्रत्येक दूध उत्पादक संस्थांकडून हे समीकरण जुळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी म्हटले आहे. चाऱ्याची कमतरता पाहता देशात पंजाब आणि हरयाणा वगळता सप्टेंबर 2023 पर्यंत परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. 


गेल्या काही दिवसांपासून दूधाच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एका बाजूने ग्राहकांना याची मोठी झळ बसत आहेच, पण दुसरीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ देत असताना त्याला नफा किती राहतो, याकडेही लक्ष दिलं पाहिजे, त्यानुसार दर दिला पाहिजे, असेही मत चेतन नरके यांनी व्यक्त केले.


नरके यांनी दूधाच्या दरांमध्ये का वाढ होत आहे तसेच या सगळ्यांमागे जनावरांमध्ये पसरलेला लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाचा परिणाम आहे का? याबाबत भाष्य केले. त्यांनी यासंदर्भात राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. ते म्हणाले, दूग्ध व्यवसायात फ्लश आणि लीन सीझन असे दोन सिझन आहेत. यामध्ये फ्लश सिझनमध्ये दूधाची पावडर करून विकतो, पण या दोन कालावधींमध्ये फ्लश सिझन आलाच नाही. 


लसीकरणाने जनावरांमधील सरासरी दूधावर परिणाम 


ते पुढे म्हणाले, पाऊस अनियमित झाल्याने चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे. त्याचबरोबर लम्पी चर्मरोगाने अनेक जनावरे दगावली आहेत. जनावरांना करण्यात आलेल्या लसीकरणामुळे त्यांच्यातील सरासरी दूधाचे प्रमाणही कमी झाले आहे. आठवडी बाजार बंद झाल्याने नवीन जनावरे बाजारपेठेमध्ये येत होती, त्याचाही परिणाम झाला आहे. या सर्व कारणांमुळे दूधाचे उत्पादन यायला हवं होतं ते आलंच नाही. 


मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत 


फ्लश सिझनमध्ये दुधाची दरवाढ होत नाही, पण या कालावधीत दूधाच्या मागणीत साडे सात ते आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे फ्लश सीझनमध्ये साडे चार टक्क्यांनी वाढ व्हायला पाहिजे ती झालेली नाही. फ्लश सीझनच्या तुलनेत लीन सिझनमध्ये दूधाच्या सरासरीमध्ये 30 टक्के फरक होतो. मागणी वाढत चालली आहे, पण पुरवठा होत नसल्याने आठ ते 10 टक्क्यांचा फरक जाणवत राहणार असल्याचे ते म्हणाले.  


ही दूध टंचाई फेब्रुवारी मार्चपर्यत जाणवत राहणार आहे, त्यामुळे खिशाला कात्री अटळ आहे. अजूनही 2 ते 3 रुपयांनी दूध वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या