Kolhapur News : गुटखा, मावा, तंबाखू खाऊन कुठंही पिचकाऱ्या मारणाऱ्यांना त्याच ठिकाणी स्वच्छ करण्यास सांगून सोशल मीडियावर फोटोसह प्रसिध्द करण्यात येईल, आपल्या माध्यमातून अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा, अशी मागणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठानकडून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना करण्यात आली आहे.


पानपट्टी विक्रेत्यांनी  व्यवसायाच्या ठिकाणी मोठे पिंप लाऊन तुमच्या ग्राहकाना त्यातच थुंकण्यासाठी सूचना करावी व तसे मोठे बोर्ड दर्शनी भागात लावून सहकार्य करावे ही नम्र विनंतीही करण्यात आली आहे. थुंकून शहर तसेच घाण करणाऱ्यांचे किळसवाणे प्रकार आढळून आल्यास https://www.facebook.com/groups/439058401630308/?ref=share या लिंकवरती फोटो पाठवून "शहर विद्रूप करणारे" म्हणून यांना प्रसिद्धी छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठानकडून देण्यात येणार आहे. या उपक्रमाची कोल्हापूरमधून सुरवात करून संपूर्ण महाराष्ट्राभर राबवण्यात येणार आहे. 


प्रतिष्ठानकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जर आपल्या शहरामध्ये रस्त्यावर, शासकीय कार्यालय, मंदीर परिसर, अपार्टमेंटस्, हॉस्पिटल्स्, सार्वजनिक वाहनातून तसेच स्वतःची वहाने, दुचाकीवरून प्रवास करताना इ. ठिकाणी जर कोणी पान, गुटखा, मावा, तंबाखू खाऊन तेथेच थुकून पिचकाऱ्या मारून तो परिसर विद्रूप केल्याचे आढळून आल्यास तसेच रस्त्यांवरून जाताना तिथेच थुंकून इतरानां जो त्रास देतात आणि त्याचा जाब विचारल्यावर आरेरावीची जी भाषा करतात त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की, उद्यापासून असे प्रकार निदर्शनास आल्यास त्यांना त्या ठिकाणी स्वच्छ करण्यास लावून त्यांचे फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॅाट्सअॅप ग्रुपवर फोटोसह प्रसिध्द करण्यात येईल, तसेच आपल्या माध्यमातून अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी आदेश काढावा. 


आपलं शहर सुंदर ठेवण्यासाठी तसेच आपले कर्तव्य म्हणून प्रत्येक जागरूक नागरिकाने असे किळसवाणे प्रकार केल्याचे  आढळून आल्यास "शहर विद्रूप करणारे" म्हणून यांना प्रसिद्धी देण्यात येणार आहोत, असेही निवेदनात म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या