Kolhapur Ganesh Immersion : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून गणेश विसर्जन मिरवणुकीला मुकल्याने त्याची कसर भरून काढण्यासाठी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच सार्वजनिक मंडळांनी कंबर कसली आहे. कोल्हापूर शहरातील पहिला मानाचा गणपती असलेल्या तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणराया विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे. हा मानाचा गणपती मार्गस्थ झाल्यानंतर शहरातील इतर मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात.


श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणरायाच्या पालखीचे पुजन आणि आरती खासबाग परिसरात करण्यात आली. फुलांनी सजविलेल्या पालखीचे शाहू महाराज आणि सतेज पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी सारथ्य करत पालखी मिरजकर तिकटीपर्यंत नेली.


मानाच्या पहिल्याच तालीम मंडळाने दिला हद्दवाढीचा संदेश 


कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून कोल्हापूर शहरात दोन गट पडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या हद्दवाढीचा सकारात्मक संदेश देण्याासाठी मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने सजीव देखावा केला आहे. मला ग्रामीण व शहर विकासासाठी हद्दवाढ हवी, असा संदेश देणारा बुलेटस्वार गणपती विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ झाला आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत या बुलेटस्वार गणपतीला मिरवणुकीत मार्गस्थ करण्यात आले. त्यामुळे पहिल्याच मानाच्या गणपतीने शहराच्या विकासासाठी सकारात्मक संदेश दिला आहे. 


यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, मनपा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, माजी महापौर आर.के.पोवार, अ‍ॅड. धनंजय पठाडे, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पोवार, लाला गायकवाड, माजी नगरसेवक आदिल फरास, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, दिलीप देसाई, आदी उपस्थित होते. तुकाराम तालीम मंडळाने पारंपारिक वाद्यांसह विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या