Kolhapur News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अध्यात्मिक आघाड्या सक्रिय झाल्याने (spiritual alliances of political parties) आव्हानाची भाषा होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध कीर्तनकार शामसुंदर सोन्नर महाराज यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे सारथी फाउंडेशनच्या माध्यमातून पहिले वारकरी कीर्तन संमेलन घेण्यात आले. यावेळी बोलताना सोन्नर महाराजांनी अध्यात्मिक आघाड्यांचा चांगलाच समाचार घेतला. 


महाराज म्हणाले की, समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदायाने केला आहे. मात्र, राजकीय पक्षाच्या अध्यात्मिक आघाड्यांमुळे प्रदूषण होत आहे. याकडे लक्ष न देता वारकरी संप्रदायाने आपली परंपरा तसेच चालू ठेवून जबाबदारीने कीर्तन मांडले पाहिजे. सोन्नर महाराज यांनी आजरा येथील पहिल्या वारकरी कीर्तन संमेलनामध्ये मांडले. दरम्यान, संमेलनाची सुरुवात विठ्ठल मंदिरापासून टाळ मृदुंगांच्या गजरात दिंडी काढण्यात आली. दिंडी सदगुरु बाबासाहेब आजरेकर नगरीत आल्यानंतर माऊली व तुकोबांच्या गाथा पूजनाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. सध्या संस्कृती लोप पावत चाललेली आहे. ही संस्कृती जपण्यासाठी वारकरी कीर्तन संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्वागताध्यक्ष आणि आजरा तालुका सहकारी कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी सांगितले. 


दुपारच्या सत्रात वारकरी संत साहित्याततील सामाजिक समता यावर परिसंवाद झाला. त्यामध्ये देवदत्त परुळेकर, कॉम्रेड संपत देसाई यांनी भाग घेतला. अध्यक्षस्थानी वार्षिक रिंगणचे संपादक सचिन परब होते. सायंकाळच्या सत्रात दिंडी प्रमुखांचा सत्कार करून सांगता करण्यात आली. गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर, राजाभाऊ शिरगुपे, जोश्ना चराटी, अस्मिता जाधव, मुकुंद देसाई आणि गडहिंग्लज आजरा ,चंदगड या भागातील मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय उपस्थित होता.


 सुषमा अंधारेंविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक 


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून वारकरी आक्रमक झाले आहेत. राज्यभरातून वारकरी संप्रदायाकडून आंदोलने केली जात आहेत. आळंदीमध्ये प्रेतयात्रा काढून वारकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वारकऱ्यांनी एकत्र येत दिंडी यात्रेचे आयोजन केले होते. या दिंडीच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक वक्तव्य हे केलं होतं. यात साधू संतांचा अपमान केल्याचा आरोप वारकऱ्यांकडून केला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या