Balumama Bhaknuk : श्रीक्षेत्र आदमापुरात (ता. भुदरगड) येथे बाळूमामा देवालयात जागरानिमित्त आज रविवारी (19 मार्च) पहाटे कृष्णात डोणे- वाघापूरकर यांची भाकणूक पार पडली. यावेळी विविध सामाजिक, आर्थिक, राजकीय तसेच आंतरराष्ट्रीय मुद्यावर भाष्य करण्यात आले.  


बाळूमामांच्या भंडाऱ्यात अशी झाली भाकणूक 


चालता बोलता मनुष्याला मरण येईल, माझं माझं म्हणू नका, माणसाला माणूस खाऊन टाकेल, येतील येतील लाकडाची डोरली येतील, तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल, येईल येईल राज्य गुंडांचे येईल, महागाईचा भस्मासूर येईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल, ऊन्हाळ्याचा पावसाळा होईल अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल, नदीकाठावरील जमीन ओसाड पडेल. कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठं भगदाड पडेल, गर्वाने वागू नका.


जगातील राष्ट्रे लढाई करतील, तिसरं महायुद्ध होईल, युद्धाचा भडका उडेल, भारत पाकिस्तानचं छुपं युद्ध होईल. चीन राष्ट्र भारतावर आक्रमण करेल, भारतीय सैनिक त्यांना परतून लावतील. तिरंगा झेंडा आनंदात राहील. कोरोनापेक्षा मोठी महामारी येईल, दीड महिन्याचे धान्य उदंड पिकंल, तांबडी रास मध्यम पिकंल. ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल, वैरणीला सोन्याची किंमत येईल, धान्यांची व वैरणीची चोरी होईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल, ऊसाचा काऊस होईल, साखरेचा भाव तेजीत राहील, ऊसाच्या कांड्याने व  दुधाच्या भांड्याने राज्यात गोंधळ उडेल,मायेचं लेकरु मायेला ओळखायचं नाही. 


पैसा न खाणारा राजकीय नेता शोधून सापडणार नाही


गर्वाचे घर खालीच होईल, होईल होईल भुकूंप होईल, जंगलातील प्राणी गावात येईल, गावातील माणूस जंगलात जाईल,बारा बाजार मोडून एक बाजार होईल,समुद्रातील संपत्तीचा नाश होईल, आदमापूर हे गाव प्रतिपंढरपूर होईल,  बाळूमामांची करशिला सेवा तर खाशीला मेवा, बारा बलुतेदारांना सुखी ठेवीन.राजकीय नेते कोलांटउड्या मारतील. सत्ता संपत्तीच्या मागे धावतील, सत्तेच्या बाजारात राजकीय नेता विकत मिळेल. पैसा न खाणारा राजकीय नेता शोधून सापडणार नाही .राजकारणात मोठा गोंधळ होईल. राज दरबारी मोठा दंगा धोपा होईल. राजकीय नेते मोठ्या घोटाळ्यात अडकून पडतील. तुरुंगात जातील. 2023 सालात राजकीय नेते उड्डाण मारतील. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा सिंहासन डळमळत राहील. महाराष्ट्रात छोटे पक्ष राजकारणात आघाडी घेतील. राजकारणात उलथापालथ होईल.


व्यापारी वर्ग शेतकऱ्याची मोठी लुबाडणूक करेल


साखरेचा भाव तेजी मंदीत राहील.गुळाचा भाव उच्चांकी राहील.साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. मनेजर आनंदी राहील. उसाचा दर चार हजारांवर जाईल.उसाचा काऊस होऊन रस्त्यावर पडेल. उसाच्या कांड्यांचा दुधाच्या भांड्यानं राज्या-राज्यात गोंधळ निर्माण होईल. व्यापारी वर्ग शेतकऱ्याची मोठी लुबाडणूक करेल. शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होईल.


इतर महत्वाच्या बातम्या