Deepak Kesarkar : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव (Paschim Maharashtra Devasthan Samiti) शिवराज नाईकवाडे यांना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून पदावरून तत्काळ बाजूला करण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या समर्थनार्थ गेल्या दोन दिवसांमधून सोशल मीडियामधून जोरदार पाठिंबा देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज समस्त कोल्हापूरकरांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात घेराव घालत या कृतीचा जाब विचारला. चोर सोडून संन्याशाला फाशी का देता? अशी विचारणाही केली. तसेच त्यांना पुन्हा पदभार देण्याची मागणी केली. यानंतर आता शिवराज नाईकवाडे यांना पदमुक्त का करण्यात आले? त्यांचा कारभार तडकाफडकी का काढून घेण्यात आला? याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी खुलासा केला आहे. 


नाईकवाडे यांच्याकडे पदभार दिला जाऊ शकेल


त्यांनी पुढे सांगितले की, महसूलची कामे पार पाडल्यानंतर नाईकवाडे यांच्याकडे पदभार दिला जाऊ शकेल. नाईकवाडे यांना पदमुक्त केल्याने अनेकांच्या मनामध्ये शंका उपस्थित झाल्या आहेत. मात्र, तसे काही नसल्याचे त्यांनी सांगितले. केसरकर यांनी पुढे सांगितले की देवस्थानच्या जमिनीच्या संदर्भातील काही प्रश्न आहेत ते निकाली काढण्यासाठी महसूलमधील अधिकाऱ्याची सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे ही काम पार पडल्यानंतर पुन्हा नाईकवाडे यांच्याकडे हा पदभार दिला जाऊ शकेल. 


केंद्रीय पुरातत्त्व विभागाचा अहवाल एका आठवड्यामध्ये सादर होणार 


दीपक केसरकर यांनी केंद्र तसेच राज्य 'पुरातत्त्व'कडून अंबाबाई मूर्तीच्या झालेल्या पाहणी संदर्भात भाष्य केले. ते म्हणाले की, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचा अहवाल आपल्याला एका आठवड्यामध्ये सादर होणार आहे. अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या संदर्भात केंद्रीय पुरतत्त्व विभागाकडून ज्या सूचना दिल्या जातील त्यानुसार काळजी घेण आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अहवाल आल्यानंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने पुजारींशी बोलून राज्य सरकारकडून योग्य निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.


इतर महत्वाच्या बातम्या :