कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीमधील चांदीचा (Silver) व्यापार करणाऱ्या व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर  तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात कोल्हापूर पोलिसांनी गुन्ह्याचा उलघडा केला असून भावानेच भावाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे ( वय 29 रा.पंचतारांकित एमआयडीसी गोकुळ शिरगांव, कोल्हापूर) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) एकच खळबळ उडाली आहे.


आरोपी प्रविण सुकुमार हालुंडे (वय 28 रा. मानेनगर रेंदाळा वाळवेकर नगर हुपरी आणि आनंद शिवाजी लेमलापूरे (वय 22 रा. श्री चौक शिवाजीनगर हुपरी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) या दोघांना चोरीस गेलेले चांदी व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलसह गोकुळ शिरागांव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पुढील तपास गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे करीत आहेत.


हत्येचा असा झाला उलघडा 


मयत ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे व त्याचा लहान भाऊ प्रविण सुकुमार हालुंडे यांची वडिलोपार्जीत मालमत्तेबाबत झालेल्या वाटणी वरुन वाद सुरु होता. पोलिसांनी हाच धागा पकडत तपास सुरु केला. प्रविणला राहत्या घरातून ताब्यात घेत तपास केला असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. पथकाने खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. 


म्हणून भावाची हत्या केली 


मयत ब्रह्मनाथ हा घरामध्ये कोणाचेही ऐकत नव्हता व वडिलोपार्जित व्यवसायाची चांदीचे दागिणे आपलेकडेच ठेवत होता. वेळोवेळी मागणी करुनही तो परत देत नव्हता तसेच तो व्यवसायामध्ये अडथळा निर्माण करत होता आदी कारणामुळे प्रविणच्या मनात राग होता. त्यामुळे प्रविण व त्याचा मित्र आनंद शिवाजी सेमलापूरेनं भावाला संपवण्याचा निर्णय घेतला. ब्रम्हनाथ हालुंडे हा घरी एकटा चांदीचे काम करत असल्याची माहिती घेत आरोपी व त्याचा मित्र आनंद घरी गेले. यावेळी भावांमध्ये वाद झाला. 


यावेळी प्रवीणने भावाला धरल्यानंतर आनंदने ब्रह्मनाथच्या छातीवर व पोटावर वार केले. त्यानंतर घरामधील सर्व चांदी घेवून गेल्याची माहिती प्रवीणने दिली. दुसरा आरोपी आनंदला रायबागमधून ताब्यात घेण्यात आले. चोरी केलेली सर्व चांदी हस्तगत करण्यात आली आहे.


सदरची कामगिरी महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक कोल्हापूर, व्ही. सुजितकुमार क्षीरसागर, उप विभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग, श्री अरविंद रायबोले परि.पोलीस उप अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, गोकुळ शिरगांव पोलीस ठाणेचे सहा पोलीस निरीक्षक दिंगबर गायकवाड, हुपरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक चौखंडे, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणेचे महा पोलीस निरीक्षक पंकज गिरी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप निरीक्षक, जालिंदर जाधव, प्रसाद कोळपे, पोलीस अर्मलदार संजय हुंबे, कृष्णात पिंगळे निवृत्ती माळी, बसंत पिंगळे, हिंदुराव केसरे, प्रकाश पाटील, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी विनायक चौगुले, विशाल खराडे, सम्रन पाटील, शांताराम तळपे, समीर कांबळे, नितेर कावळे, अमित सर्जे, राजेंद्र वरांडेकर यानी केली.


इतर महत्वाच्या बातम्या