Hasan Mushrif on Supriya Sule : कागलमध्ये ईडी प्रकरण कोणामुळे झालं याची माहिती सुप्रियाताई सुळे यांनी घ्यायला हवी होती. त्या ह**खोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जाण्याचे टाळायला हवं होतं, अशा शब्दांमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजिसिंह घाटगे यांच्यावर नाव न घेता काढून हल्लाबोल केला.


रविवारी हसन मुश्रीफ यांच्याकडून मुंबईमध्ये कागल गडहिंग्लज मतदारसंघातील लोकांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. दुसऱ्या बाजूला समरजिसिंह घाटगे यांनी सुद्धा पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला संबोधित करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मुश्रीफ यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला होता. कागलध्ये ईडी पोहोचल्यानंतर घरातील पुरुष मागे बसले होते. मात्र, घरातील महिला पुढे आली होती अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांनी तोफ डागली होती. 


त्या ह***खोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी जाणं टाळायला हवं होतं


या टीकेला आता हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, कागलमध्ये ईडी कोणामुळे आली याची माहिती सुप्रिया सुळे यांनी घ्यायला हवी होती. त्या ह***खोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी जाणं टाळायला हवं होतं, असे ते म्हणाले. मुंबईमध्ये झालेला मेळावा न भूतो न भविष्यती झाल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. ते म्हणाले की मुंबईमधील मेळाव्यासाठी तीन हजारावर लोक येणं अपेक्षित होतं. मात्र, 5 हजारांवर लोक आल्याने थोडीशी गैरसोय झाली. गावामध्ये झालेली कामं त्यांनी सणासुदीला घरी आल्यानंतर त्यांनी पाहिली असल्याचे मुश्रीफ म्हणाले. 


संजय राऊतांच्या दाव्यात तथ्य नाही


दरम्यान, संजय राऊत यांनी महायुतीमधून अजित पवार यांना बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न सुरु असल्याचा दावा केला आहे. याबाबत त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं यामध्ये काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. आम्ही विधानसभा तिन्ही पक्ष मिळून लढणार आहोत हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. त्यामुळे ज्या काही बातम्या येत आहेत त्यात काही तथ्य नाही. तिन्ही नेते बैठकीला बसतील आणि आणि त्यानंतर कुणाला किती जागा मिळतील हे ठरवलं जाईल, असे त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या