Kolhapur News : कोल्हापूरसह जयसिंगपूर व गडहिंग्लज या तिन्ही बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले. ही नियुक्ती पुढील सहा महिन्यांसाठी किंवा नवे संचालक मंडळ अस्तित्वात येईपर्यंत असेल असेही या आदेशात म्हटले आहे. या बाजार समित्यांवर अशासकीय प्रशासक मंडळांची मुदत संपल्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून सचिवांच्या माध्यमातून कारभार सुरु होता.
प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या या बाजार समितीमधील संचालक मंडळाची मुदत सप्टेंबर 2020 रोजी संपली आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबवणीपर पडत गेल्या आहेत. राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या संस्थांवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या मंडळाची सुद्धा 22 एप्रिल 2022 रोजी मुदत संपली आहे.
अशासकीय मंडळाची मुदत संपल्यानंतर तर बाजार समित्यांचे कामकाज ठप्प होते. कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते. तर, इतर प्रशासकीय कामेही प्रलंबित होती. शिंदे यांनी कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचे आदेश दिल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला होता. कामांवर नियंत्रण रहावे म्हणून या समित्यांचा कारभार सचिवांकडे सोपवण्यात आला होता.
समित्यांवर अशासकीय मंडळाला मुदतवाढ मिळावी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने 9 मे 2022 रोजी पणन संचालकांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. परंतु, यासंदर्भातही आदेश झाले नव्हते. परिणामी, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी कोल्हापूर बाजार समितीवरील अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्तीचा आदेश रद्द करून समितीवर प्रशासक नियुक्तीची कारवाई केली.
इतर महत्वाच्या बातम्या