Karnataka Bhavan at Sidhgiri Kaneri mutt : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी कोल्हापुरातील सिद्धगिरी कणेरी मठात कर्नाटक भवन उभारणीसाठी पायाभरणी केली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शशिकला जोल्ले आणि बोम्मई मंत्रिमंडळातील दहा मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.


कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यावेळी बोलताना म्हणाले की, जन्मभूमी आणि कर्मभूमी याबरोबरच मातृभूमीही महत्त्वाची आहे. तिला विसरू नये. आपली संस्कृती व्यवस्थित असेल, तरच देशाची प्रगती होते आणि त्यासाठी भक्ती आणि शक्तींचे व्यासपीठ म्हणजेच मठ आवश्यक आहे. नव्या पिढीत संस्काराची बिजे पेरण्यासाठी मठांचे अस्तित्व रहायला हवे. कणेरी येथील सिद्धगिरी मठावर संत मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला देशातील विविध मठांचे महंत, संन्यासी उपस्थित होते.






हा मठ काडसिद्धेश्वर महाराज चालवतात, जे देशी गायींच्या संवर्धनासाठी, सेंद्रिय शेतीसाठी ओळखले जातात. कणेरी मठावर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पर्यटक तसेच भाविक मोठ्या संख्येने येत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, अण्णा हजारे, योगगुरू बाबा रामदेव आणि इतर अनेक व्यक्तींनी यापूर्वी मठाला भेट दिली आहे. कर्नाटक भवनासाठी एकूण 7 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सोमवारी बोम्मई यांनी जाहीर केले की या कामासाठी तातडीने 3 कोटी रुपये दिले जातील. त्यांनी ट्विट केले की, कोल्हापूरमधील कणेरी मठावर कर्नाटक भवनचे बांधकाम सुरू केले.


मठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्नाटक भवन हे विद्यार्थी, तज्ज्ञांसाठी सेवा देईल. ज्यांना या ठिकाणी राहून संशोधन करायचे किंवा मठात विकसित केलेल्या मॉडेल्सचा अभ्यास करायचा आहे. मठातील मोठ्या संख्येने येणारे पर्यटक तसेच  भाविक कर्नाटकातील आहेत आणि ते देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.


इतर महत्वाच्या बातम्या