Kolhapur News: एकशे सात किलो वजन, सहा फूट चार इंच उंच असलेल्या धिप्पाड शरीरयष्टी लाभलेल्या रांगड्या पैलवानाचा गोठ्यात कडबा कुट्टी मशीनचा शाॅक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) करवीर तालुक्यातील कावणेमध्ये घडली. पैलवान शिवदत्त उर्फ सोन्या मारुती पाटील (वय 28 रा. कावणे, ता. करवीर) याचा विजेच्या धक्क्याने हृदयद्रावक मृत्यू मंगळवारी झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. भावाच्या अकाली मृत्यूमुळे बहिणींनी एकच आक्रोश केला. 


शेतात जनावरांच्या गोठ्यात कुट्टी मशीनने वैरण बारीक करत असताना शाॅक लागल्याने सोन्याचा अकाली मृत्यू झाला. लेकाच्या अकाली मृत्यूने  कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पैलवान सोन्याच्या दुर्दैवी मृत्यूने गावावरही शोककळा पसरली आहे. निगवे खालसा गावातील तालमीमध्ये सोन्या सराव करणाऱ्या शिवदत्तने कुस्तीमध्ये ओळख निर्माण केली होती. त्याने पैलवानकी करतच आपले पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. शिवदत्तचे वडील 'गोकुळ'मध्ये प्रशिक्षण वर्गाचे अधिकारी आहेत. तसेच प्रवचनकार, कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख असल्याने घरामध्ये एक प्रकारे भक्तीमय वातावरण आहे. 


शिवदत्त पैलवानकी करत असतानाच घरची जनावरे सांभाळून दुग्ध व्यवसाय करत होता. मंगळवारी शेतातील जनावरांच्या गोठ्याकडे गेला असता कडबा कुट्टी मशीनच्या सहाय्याने वैरणीची कुट्टी करत असताना विजेचा धक्का बसला आणि तो तिथेच कोसळला. बराच वेळ होऊनही शिवदत्त घरी न आल्याने आईने त्याच्या फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फोन उचलत नसल्याने आई गोठ्याकडे गेली तेव्हा शिवदत्त कडबा कुट्टी मशीनच्या बाजूस पडलेला दिसला. यावेळी आईने केलेल्या आरडाओरडा ग्रामस्थही दाखल झाले. शिवदत्तला ग्रामस्थांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


धावत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने काळाचा घाला


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये (Gadhinglaj) वादळी पावसाने वाढदिनीच अविवाहित तरुणावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना दोन दिवसांपूर्वी घडली. प्रचंड वादळी वाऱ्याने बाभळीचे झाड कोसळून थेट धावत्या दुचाकीवर कोसळून आकाश आण्णाराव धनवडे (वय 26 वर्षे) या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. घरात वाढदिवस असल्याने उत्साहाचे वातावरण तसेच लग्नाची बोलणी सुरु असतानाच एकुलत्या मुलावर काळाचा घाला आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. 


इतर महत्वाच्या बातम्या