मुंबई: कोल्हापूरच्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूरला वगळण्यात आलं आहे. तसा आदेश राज्य सरकारने पारित केला आहे. शक्तिपीठ महामार्ग हा राज्यातील एकूण 12 जिल्ह्यातील 29 तालुके आणि 370 गावांतून जाणार आहे. हा प्रकल्प हाती घेण्यास, आखणीस आणि भूसंपादनासाठी शासनाने मान्यता दिली आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन संपादनासाठी अधिग्रहणासाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार कोल्हापुरातील गावं वगळण्यात आली आहेत. त्यासंदर्भात पुन्हा चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करुन निर्णय
पहिल्या टप्प्यात वर्ध्यातील पवनार ते सांगली अशा भूसंपादनेला मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यातील आखणी रद्द करण्यात आली आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत मुख्मयंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री चर्चा करणार आहे.
Kolhapur Protest Against Shaktipeeth : शक्तिपीठला कोल्हापुरातून विरोध
शक्तिपीठ महामार्गाची घोषणा झाल्यापासूनच कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी याला विरोध केल्याचं दिसतंय. माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी या प्रश्नी आवाज उठवला. त्यानंतर सांगली, सोलापूर, धाराशिव आणि इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनीही या महामार्गाला विरोध केला.
कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीतून होऊ नये, त्यासाठी आमच्या शेतजमिनी देणार नाही अशा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याचं दिसतंय. कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता राज्य सरकारने आता या ठिकाणची भूसंपादन प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला.
Shaktipeeth Expressway : कसा असेल शक्तिपीठ महामार्ग?
विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
कोणत्या देवस्थानांना हा महामार्ग जोडणार?
कोल्हापूर - अंबाबाई, तुळजापूर - तुळजाभवानी. नांदेड - माहूरची रेणुका देवी या तीन शक्ती पीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंधा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.
ही बातमी वाचा: