कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेला मिळालेल्या झंझावाती यशानंतर श्रीमंत शाहू छत्रपती आज (10 जून) मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून शाहू महाराज यांचे जोरदार स्वागत व आदरातिथ्य करण्यात आले. शाहू महाराजांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. 






शाहू महाराज छत्रपती यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांना शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर लोकसभा हा पारंपारिक ठाकरे गटाचा मतदारसंघ आहे. मात्र, शाहू महाराजांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसला सोडली होती. काँग्रेसकडून शाहू महाराज यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा एक लाख 54 हजारांवर मतांनी पराभव केला. 






कोल्हापूर लोकसभेला शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर दौऱ्यात राजवाड्यावर जात अभिनंदन केलं होतं. तसेच विजयाचा निर्धार सुद्धा व्यक्त केला होता. त्यानंतर कोल्हापुरात गांधी मैदानामध्ये झालेल्या शिव शाहू निर्धार सभेला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी संबोधित करत शाहू महाराजांच्या विजयासाठी आवाहन केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर शाहू महाराज उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले. 




तत्पूर्वी शाहू महाराजांनी काल (9 जून) दिल्ली दौरा करत काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी केल्या होत्या. काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचीही भेट घेतली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या