Kolhapur Shahi Dasara : ऐतिहासिक आणि देदीप्यमान परंपरा असलेल्या कोल्हापूरच्या शाही दसरा यंदा दोन दिवस आहे. शाहू महाराज यांनी परवानगी दिल्यानंतर कोल्हापूरच्या शाही दसऱ्यामध्ये शासनाचा सक्रीय सहभाग असणार आहे.


दसरा महोत्सवाअंतर्गत जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्यावतीने आज मंगळवारी सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीट साजरा करण्यात येणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून व दसरा महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.


खाद्यपदार्थांची पर्वणी  


महावीर कॉलेज ते स्टार बझार, खानविलकर पेट्रोल पंप या रस्त्याच्या दोन्ही बाजूस दोन कमानी उभा करुन बचत गटांचे 150 स्टॉल्स उभे केले आहेत. या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या मेजवाणीबरोबरच विविध वस्तुचे स्टॉल्स, मुलांना खेळण्यासाठी खेळणी ठेवण्यात आली आहेत. याचबरोबर लेझीम, झांजपथके, गरबा नृत्य, ड्राईंग, स्केचींग, लाठीकाठी, झिम्मा फुगडी, मेहंदी, फनी गेम्स, पारंपरिक खेळ असतील. गोट्या, टायर फिरवणे, विटी-दांडू, कुस्ती, चुयीमुयी, गजगे असे पारंपरिक खेळ खेळले जाणार आहेत. त्याचबरोबर नृत्य, गायन, मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत. 


महापालिकेकडूनही सुविधा


या ठिकाणी महापालिकेच्यावतीने लाईटची व्यवस्था, वैद्यकीय पथक, अग्निशमन गाडी, पिण्याच्या पाण्याचा टँकर आदी सुविधा ठेवण्यात येणार आहेत. दोन ठिकाणी 100 फुटी डी.पी.रोड व महावीर कॉलेज या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर महापालिका मुख्य इमारत व शहरातील मुख्य पुतळयांभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या फेस्टीवलचे संयोजन शाही दसरा उत्सव समितीने केले आहे. 


दसरा महोत्सव लोकसहभागातून अधिक व्यापक आणि अधिक भव्य स्वरुपात साजरा करण्यावर राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.  जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहकुटुंब या 'शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीट'ला भेट द्यावी, तसेच दसरा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


लोकसहभागावर भर


हा महोत्सव लोकसहभागातून अधिक व्यापक आणि अधिक भव्य स्वरुपात साजरा करण्यावर राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. या दसरा महोत्सवात अधिकाधिक नागरिक सहभागी होण्यासाठी तसेच यात विविध घटकांना सामाविष्ट करुन घेवून या महोत्सवाला शाहूकालीन महोत्सवाचे स्वरुप प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या