Kolhapur Crime: लाचखोर तलाठ्यांची मालिका कायम आहे. आता कोल्हापुरात (Kolhapur News) 20 हजारांची लाच घेताना तलाठ्याला व खासगी उमेदवाराला रंगेहाथ पकडण्यात आले. खरेदी केलेल्या जमिनीच्या व बँकेच्या कर्जाच्या दस्ताची फेरफार नोंद करण्यासाठी उमेदवारांकडून 20 हजार रुपयाची लाच घेताना हातकणंगले तालुक्यातील साजणी-तिळवणीचा तलाठी सर्जेराव शामराव घोसरवाडे (वय 41, रा. स्वप्नपूर्ती अपार्टमेंट, पुईखडी, नवीन वाशी नाक्‍याजवळ, कोल्हापूर. मुळगाव रा. कांडगाव, ता. करवीर) व उमेदवार साहिल यासीन फरास (वय 23, रा. साजणी) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने साजणी येथील गट नंबर 188 मधील 21 गुंठे जमीन रितसर दस्ताने खरेदी केली आहे. तर त्यांच्या वडिलांनी तिळवणी येथील गट नंबर 185 मधील जमिनीवर काढलेल्या बँकेच्या कर्जाच्या दस्ताची फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी सर्जेराव घोसरवाडे याने 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. या लाचेची रक्कम उमेदवार साहिलला घेण्यास सांगितले होते. गावचावडीत वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लावलेल्या सापळ्यात साहिल रंगेहाथ सापडला. त्यानुसार या दोघांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, उपनिरीक्षक संजीव बंबर्गेकर, विकास माने, सुनील घोसाळकर, रूपेश माने, उदय पाटील, सूरज अपराध यांच्या पथकाने केली.


जत तालुका तलाठी संघटनेचा अध्यक्ष दुसऱ्यांदा लाच घेताना थेट घरातच सापडला


दरम्यान, गेल्या महिन्यात सांगलीतील जत तालुक्यातील करजगी येथील वादग्रस्त तलाठी लाचखोर असूनही जत तालुका तलाठी संघटनेचा अध्यक्ष म्हणून थाटात मिरवणारा बाळासाहेब शंकर जगतापला 50 हजारांची लाच घेताना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घरातच रंगेहाथ पकडले होते. लाचखोर जगतापने आपल्या तिल्याळ गावी शेततळे बांधलं आहे. या तळ्याचे पूजन आणि सुवासिनींसाठी प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पाहुणे मंडळी सुद्धा आली होती. त्यांच्यासमोरच जगताप लाचलुचपतने रंगेहाथ पकडून कारवाई केली होती. 


लाचखोर जगताप हा दुसऱ्यांदा लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. 7 जुलै 2014 रोजी तक्रारदाराच्या खरेदी दस्ताची नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी 10 हजार लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यावेळी मिरज शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.


इतर महत्वाच्या बातम्या