CM Eknath Shinde In Kolhapur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवघ्या एक महिन्यामध्ये दुसऱ्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर (Kolhapur News) येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 14 जुलै रोजी कोल्हापुरात पेटाळा मैदानावर मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या महिन्यात 13 जून रोजी कोल्हापूर दौरा केला होता. त्यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम पार पडला होता. तसेच लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला होता. याचवेळी एका अनामिक सर्व्हेची हवा करून दैनिकांना जाहिराती दिल्याने फडणवीसांची नाराजी ओढवून घेतली होती. राज्यात फडणवीसांपेक्षा आपण लोकप्रिय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्याकडे पाठ फिरवली होती, तर मुख्यमंत्र्यांना भाषणात फडणवीस कसे उजवे आहेत हे सांगण्याची वेळ मेळाव्यातून आली होती.

  


या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे या दौऱ्यात जिल्ह्यातील गटातील आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी 14 जुलै रोजी पेटाळा मैदानावर सायंकाळी 4 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज शाहू स्मारक सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर ठाणे, छत्रपती संभाजीनगरनंतर सर्वाधिक पडसाद कोल्हापूरमध्ये उमटले. दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी शिंदे गटाच्या गळाला लागले. जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके सुद्धा शिंदे गटात आहेत.


दोन्ही खासदारांचे भवितव्य अंधातरीच  


दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये भाजपच्या तयारीने दोन्ही विद्यमान खासदारांना आगामी लोकसभेत कोणाकडून तिकिट मिळणार हे त्यांनाच माहित नसावे, अशी स्थिती आहे. लोकसभेसाठी काँग्रेस, शिंदे गटाकडून कोल्हापूरच्या जागेवरून दावे प्रतिदावे सुरु असतानाच आता अजित पवार गटाची भर पडली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केल्याने धैर्यशील माने काय करणार? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून धैर्यशील माने यांची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांना तिकिट मिळणार की नाही? मिळाले तर ते नेमके कोणाच्या चिन्हावर लढणार? असेही प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुसरीकडे, जिल्ह्यात काँग्रेस विरोधकांची संख्या वाढत चालली असली, तरी लोकसभेला उमेदवार कोण असणार? महाविकास आघाडी म्हणून लढल्यास उमेदवार कोण? काँग्रेसला जागा मिळाल्यास त्यांचा उमेदवार कोण? ठाकरे गटाला मिळाल्यास कोणाच्या पारड्यात वजन पडणार? असे बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या