Maharashtra Kesari : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे अहमदनगर येथे अयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघासाठी निवड चाचणी झाली. खुल्या गटातून महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील (देवठाने), संग्राम पाटील (आमशी) यांची मॅट गटातून तर अरूण बोंगार्डे (बानगे) व शुभम शिदनाळे (दत्तवाड) यांची माती गटासाठी निवड झाली. हे कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. (Maharashtra Kesari)


खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते या निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन मोतीबाग तालीमत झाले. यावेळी तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष हिंदकेसरी दिनानाथ सिंह, जनरल सेक्रेटरी ॲड. महादेवराव अडगुळे, अशोक माने, अमृत भोसले उपस्थित होते. जिल्ह्याभरातून 300 हून अधिक मल्ल सहभागी झाले होते. गादी गटातून महाराष्ट्र केसरी निवड चाचणीसाठी पृथ्वीराज पाटीलची लढत कौतुक डाफळे यांच्याशी झाली तर संग्राम पाटीलने वाकरेच्या तेजस मोरेचा पराभव केला. माती गटातून शुभम सिद्धनाळनं शित्तूरच्या कुमार पाटील याच्यावर मात केली. दुसऱ्या लढतीत अरूण बोंगार्डेने मिणचेच्या श्रीमंत भोसले याच्यावर मात केली. खासदार मंडलिक यांनी मंडलिक ट्रस्टतर्फे मोतीबाग तालमीच्या नूतनीकरणासाठी 30 लाखांचा धनादेश तालीम संघाचे अध्यक्ष पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. (Maharashtra Kesari)


महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर बाळासाहेब लांडगेंचं वर्चस्व


दरम्यान, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर (Maharashtra Kustigir Parishad) नक्की कोणाचा अधिकार असेल यावरुन सुरु असलेल्या वादात न्यायालयाने बाळासाहेब लांडगेंच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे यावर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Maharashtra Kesari) आपणच भरवणार असल्याचं बाळासाहेब लांडगे यांनी म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय कुस्तीगीर संघाने शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सचिव असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केली होती. त्यानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अस्तित्वात आली होती. 


बाळासाहेब लांडगे सचिव असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला भारतीय कुस्तीगीर संघाने बरखास्त  करताना जी प्रक्रिया करण्यात आली ती योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आता जरी हा निकाल बाळासाहेब लांडगे यांच्या बाजूने लागला असला तरी या वादाचे अनेक अंक आपल्याला न्यायालयात, धर्मादाय आयुक्तांकडे (Charity Commissioner) पाहायला मिळणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या