Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याती म्हाळूंगेत बेपत्ता झालेल्या वृद्धेचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उसणवारीने कर्जबाजारी झालेल्या बाप लेकाने वृद्धेचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. लक्ष्मीबाई पाटील (वय 75) असे खून झालेल्या दुर्दैवी वृद्धेचे नाव आहे. लक्ष्मीबाई पाटील यांच्या अंगावरील दागिन्यांसाठी त्यांनी गळा दाबून खून केला. वृद्धेचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात घालून निगवे खालसा दरम्यानच्या ओढ्याखाली टाकल्याची कबुली आरोपींनी दिली. बचाराम शंकर पाटील (वय 45) आणि त्याचे वडील शंकर पाटील (वय 70) या दोघांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. 23 नोव्हेंबरला ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये नोंद केली होती.


गावातील तिघा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर एकाला खाक्या दाखवताच त्याने सर्व माहिती पोलिसांना दिली. गावातील बसवलेल्या सीसीटीव्हीमुळे हा प्रकार उघडकीस आला. कॅमेऱ्यात लक्ष्मीबाई या आरोपीच्या घरी गेलेल्या दिसतात, पण परत न आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे संशयित आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. बचाराम व शंकर या दोघांनी लक्ष्मीबाई घरी आल्यानंतर गळ्यातील दागिने काढून घेत गळा दाबून खून केला. त्यांनी उसणे घेतलेले पैसे परत करण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांचा वापर केला.त्यांनी पैसे संबंधितांना परत केले होते. पोलिसांनी याच अनुषंगाने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 


भामटेत दोन सख्ख्या चिमुरड्या भावांचा तळ्यात बुडून मृत्यू 


दरम्यान, करवीर तालुक्यामधील भामटेत तळ्यात बुडून दोन सख्ख्या चिमुरड्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. गाव तळ्यात अंघोळीसाठी दोघे भाऊ गेले असताना बुडाले. राजवीर महादेव पाटील व समर्थ महादेव पाटील अशी त्या मुलांची नावे आहेत. राजवीर पहिलीमध्ये, तर समर्थ दुसरीच्या वर्गात शिकत होता. या घटनेनंतर भामटेत शोककळा पसरली आहे. दरम्यान, शनिवारही कोल्हापूर जिल्ह्यासाठी घातवार ठरला होता. वेगवेगळ्या अपघातांमध्ये 5 जणांचा बळी गेला. इचलकरंजीमधील गणेशनगरमध्ये रेल्वे पोलिसांच्या गाडीखाली चिरडून अवघ्या 12 वर्षीय शाळकरी मुलाचा चिरडून मृत्यू झाला. उतरणीला पोलिसांचे वाहन मागे येऊन हा अपघात घडला. राज सुरेश चव्हाण असे दुर्दैवी अंत झालेल्या मुलाचे नाव आहे. शहापूर पोलिसांनी वाहनचालक सूर्यकांत अप्पासाहेब कांबळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या