Sanjay Raut In Kolhapur : शिवसेना नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ असलेल्या खासदार संजय राऊत यांचा पहिल्यांदाच कोल्हापूर दौरा पार पडला. दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी कोल्हापूरसह (Kolhaur) शाहूवाडी तालुक्यातील सरुड, इचलकरंजी तसेच गडिंग्लजमध्ये शिवगर्जना मेळावे घेत शिवसेनेतील बंडखोरांवर चांगलाच निशाणा साधला. यावेळी त्यांनी केलेल्या शिंदे गटाला उद्देशून 'चोरमंडळ' वक्तव्यावरुनही रणकंदन सुरु आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा कोल्हापूर दौरा चांगला राजकीय चर्चेमध्ये राहिला. 


मात्र, ही चर्चा होत असतानाच त्यांच्या दौऱ्यामध्ये झालेल्या भेटीगाठी राजकीय भुवया उंचावणाऱ्या ठरल्या. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले चेतन नरके, राधानगरी भुदरगड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील, कोल्हापुरात पक्षातील पदाधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीमधील माजी नगसेवकांच्या झालेल्या भेटी राजकीय चर्चेचा विषय ठरल्या. 


शाहू महाराजांची घेतली भेट


खासदार संजय राऊत यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय भुवया उंचावल्या आहेत. माजी खासदार संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर संभाजीराजे आणि शिवसेनेमध्ये चांगलाच सामना रंगला होता. त्यावेळी शाहू महाराजांनी जाहीर भाष्य करुन वादावर पडदा टाकला होता. कोल्हापुरातील दोन्ही खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेला दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार शोधावे लागणार आहेत. त्यामुळे झालेल्या भेटीगाठी महत्वपूर्ण आहेत. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची घेतलेल्या भेटीमुळे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात असल्याची चर्चा रंगली आहे. या भेटीनंतर गुरुवारी गोकुळचे संचालक चेतन नरके यांचीही संजय राऊत यांनी भेट घेतली. यावेळी अरुण नरकेही उपस्थित होते. चेतन नरकेही कोल्हापूरमधून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. 




के पी पाटील संजय राऊतांच्या भेटीला


राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी संजय राऊत यांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीतून कोणताही राजकीय अर्थ काढू नका असे पाटील यांनी म्हटलं असलं, तरी ते चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे के. पी. पाटील ठाकरे गटाची मशाल हाती घेणार का? अशी चर्चा रंगली आहे.




दुसरीकडे आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीघाटीही संजय राऊत यांच्याकडून झाल्या. राजेश लाटकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी महाविकास आघाडीमधील माजी नगरसेवकांसोबत संवाद साधला. यावेळी राजेश लाटकर, रमेश पुरेकर, सुनील मोदी, माजी महापौर भीमराव पवार, वंदना बुचडे यांच्या पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे संजय राऊतांनी केलेल्या भेटीगाठी राजकीय फलद्रुप झाल्यास कोल्हापूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. 


भाजपकडून जोरदार तयारी


कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर कमळ फुलवण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. कोल्हापूर शिंदे गट आणि भाजप एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, या दोन्ही जागांवर विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिवसेनेकडून लढणार की कमळ हाती घेणार? याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे महाविकास आघाडी लोकसभेलाही एकत्र राहिल्यास कोल्हापुरात त्यांच्याविरोधात नवीन चेहरे असतील यात शंका नाही.  


इतर महत्वाच्या बातम्या