Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील मेहुण्या पाहुण्यांचा अंदाज लागेना अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील (K. P. Patil) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये के. पी. पाटील आणि त्यांचे नात्याने मेहुणे असलेले ए. वाय. पाटील (A Y Patil) यांच्यात राजकीय वाद चांगलाच रंगला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसांच्या घडामोडींकडून दिसून येत आहे. असे असतानाच आता के पी पाटील यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.
दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा
संजय राऊत शिवगर्जना मेळाव्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काल (1 मार्च) शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या निवासस्थानी के. पी. पाटील आणि संजय राऊत यांची भेट झाली. उभयंतांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका असा संदेश के. पी. पाटील यांनी देण्याचा प्रयत्न केला असला, तरी मात्र भेटीची वेळ पाहता नक्कीच राजकीय भेट असेल यात शंका नाही.
राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरणार की? मशाल हाती घेणार?
दरम्यान, या भेटीनंतर राजकीय प्रवास आणि कारखान्याचा कारभार कसा सुरु आहे या संदर्भातील माहिती दिल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. राधानगरी मतदारसंघातून ते राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे शिंदे गटामध्ये गेल्याने त्यांच्याविरोधात कोण असणार याची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे ए. वाय. पाटील हे सुद्धा याच मतदारसंघांमधून इच्छुक आहेत. त्यांनी मेळावा घेऊन इच्छाही बोलूनही दाखवली होती. त्यामुळे के. पी. पाटील राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरणार की? मशाल हाती घेणार याची चर्चा सुरु झाली आहे.
अजित पवारांच्या दौऱ्यात दोन्ही नेते एकत्र
दरम्यान, नुकत्याच झालेल्या अजित पवारांच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील (A Y Patil) आणि त्यांचे राजकीय विरोधक असलेले आणि नात्याने मेहुणे पाहुणे असलेले के. पी. पाटील (K. P. Patil) एकाच व्यासपीठावर आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये या मेहुणे पाहुण्यांमध्ये राजकीय वाद टोकाला गेला आहे. ए. वाय. पाटील यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. मात्र, त्यांचं बंड शमवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं होतं. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड अंतर्गत वाद सुरु असल्याने त्याचा परिणाम पक्षावरही झाला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेल्या ए. वाय. पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निर्णय घेण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ते शिंदे गटाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिसून आल्यानंतर ते शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा रंगली. मात्र हसन मुश्रीफ यांनी दोन्ही नेत्यांना शांत केले होते. त्यामुळे वाद मिटल्याचे दिसून आले होते.
इतर महत्वाच्या बातम्या