Sanjay Raut In Kolhapur : खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला उद्देशून विधीमंडळ नव्हे, तर चोरमंडळ असा उल्लेख केल्यानंतर चांगलेच रणकंदन सुरु आहे. त्यांना खुलासा करण्यासाठी हक्कभंग समितीकडून नोटीस धाडण्यात आली आहे. या नोटीसवरुन त्यांनी शिंदे सरकारला आव्हान दिलं आहे. आजच (3 मार्च) उत्तर देण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांनी तुरुंगात टाकून झाले, आता फासावर लटकवणार असाल, तर लटकवा, असे आव्हान दिले.


दरम्यान, कोण संदीप देशपांडे? ते कोठे असतात? अशी विचारणा करत त्यांनी असा कोणावरही हल्ला योग्य नसल्याचे संजय राऊत म्हणाले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नसल्याचा आरोप त्यांनी केला. संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला आहे. राज्याचे गृहमंत्री निवडणूक असलेल्या भागात कायदा हातात घेऊन यंत्रणा राबवतात, असाही टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 


माझं वक्तव्य एका विशिष्ट गटासाठी उद्देशून 


हक्कभंग समितीवरुनही त्यांनी हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी सांगितले की, "हक्कभंग नोटीस माझ्याकडे आलेली नाही. ती घरी पाठवण्यात आली आहे. सरकार बेकायदेशीर असल्याने सगळंच बेकायदेशीर सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उद्देशून देशद्रोही असा उल्लेख केला. मी कोणत्याही प्रकारे आमदारांचा अपमान होईल, असे वक्तव्य केलेलं नाही. माझं वक्तव्य एका विशिष्ट गटासाठी उद्देशून होते. त्यांना चोर म्हणतो. पक्षाचे नाव आणि चिन्हाची चोरी करुन आपलीच म्हणून सांगणे यावरुन ते वक्तव्य होते. मी हे वक्तव्य बाहेर केलं आहे. अशा लोकांना अख्खा देश चोर म्हणत आहे. बच्चू कडूंना अशाप्रकारे म्हणून दाखवून दिलं आहे."


तक्रारदाराला न्यायाधीश करण्याचा प्रकार 


तक्रारदारालाच न्यायाधीश करण्याचा प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले. शरद पवारांनी मांडलेल्या भूमिककडे लक्ष वेधले असता संजय राऊत यांनी सांगितले की, "पवार साहेब खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना घटना माहित आहे, जागरुक असतात. पवारांनी भूमिका मांडली. हक्कभंग समितीमध्ये मूळ शिवसेनेचा एकही सदस्य नाही. तक्रारदाराला न्यायाधीश करण्याचा प्रकार आहे. त्यांनी भूमिका व्यक्त केली आहे. शिंदे गटाकडून यात्रा काढण्यात येणार असल्याने त्यांनी टोला लगावला. पहिल्यांदा धनुष्यबाण नीट उचला, रामायणात रावणानेही उचलला होता, काय झालं ते सर्वांना माहित आहे. असली ढोंग चालत नाही, सगळा पैशांचा खेळ असतो." 


त्यांची आता झोप उडाली आहे 


कसब्यामध्ये भाजपच्या झालेल्या पराभवावरून त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. "त्यांना घाम फुटला असून त्यांची झोप सुद्धा उडाली आहे. चिंचवडमध्येही आम्ही पराभव मानत नाही. भाजपने आमच्यातील बंडखोर उभा केला. चिंचवड हा जगतापांचा आहे," असं राऊत म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या