Satej Patil : माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांची काँग्रेसच्या (Congress) गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी आज सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वप्रथम महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवणारे सतेज पाटील काँग्रेसचा चेहरा आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक काँग्रेस आमदार निवडून आणण्यामध्ये त्यांचा सर्वाधिक वाटा आहे. तसेच कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही आहेत. 


काँग्रेस पक्षाने आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आता पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे, या पदालाही न्याय देण्याचा प्रयत्न करु, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील कॅम्पेन तसेच यात्रा राज्यात पोहोचल्यानंतर त्यांनी दाखवलेलं शक्तीप्रदर्शनही चांगलेच चर्चेत होते.


भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येण्यापूर्वी पहिली जाहीर सभा कोल्हापुरात त्यांच्याच नेतृत्वात पार पडली होती. सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. आघाडी सरकारमध्ये 2010 ते 14 या कालावधीत त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहराज्यमंत्री, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन अशा विविध विभागांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती.


महाविकास आघाडीचा पहिला पॅटर्न कोल्हापुरात 


राज्यात भाजपची सत्ता असली, तरी कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार किंवा खासदार नाही. चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे असले, तरी ते पुण्यातून नेतृत्व करतात. कोल्हापुरात भाजपला अस्मान दाखवण्याचे काम सतेज पाटील यांनी केलं आहे. कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडीचा पहिला पॅटर्न त्यांच्याच नेतृत्वात राबवण्यात आला होता. यानंतर हा प्रयोग राज्याच्या सत्तेतही केला गेला. 


इतर महत्वाच्या बातम्या