Sandeep Deshpande : मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) मॉर्निंग वॉकच्या वेळी ही घटना घडली आहे. देशपांडे यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला (Attack On Sandeep Deshpande) केल्याचा संशय आहे.
कसा झाला हल्ला?
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे सध्या सुखरुप आहेत. त्यांना थोडा मार लागला आहे. त्यांनी उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाजी पार्क पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
संदीप देशपांडे यांच्यावर भ्याड हल्ला : संतोष धुरी
मनसे नेते संतोष धुरी म्हणाले, "संदीप देशपांडेंवर भ्याड हल्ला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकवेळी हा हल्ला झाला आहे. मॉर्निंग वॉकवेळी संदीप देशपांडे यांना एकट्याला पाहून चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी चेहरा पूर्ण झाकलेला होता. हा पूर्वनियोजित कट होता. क्रिकेट स्टम्पने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे."
हल्लेखोरांचा चेहरा लवकरच समोर येईल
संदीप देशपांडेंनी अनेक घोटाळे बाहेर काढले आहे. त्याचाच राग मनात धरुन हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हल्लेखोरांचा चेहरा लवकरच समोर येईल, असे देखील संतोष धुरी म्हणाले.
संदीप देशपांडे यांना गप्प करण्यासाठी हल्ला?
या घटनेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. परिणामी दादर परिसरात तणावाचं वातावरण आहे. हा राजकीय हल्ला असल्याचा आरोप केला जातो. संदीप देशपांडे यांना गप्प करण्यासाठी हा हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे. संदीप देशपांडे यांच्यावर कोणी हल्ला केला, हे समजू शकलेलं नाही. शिवाजी पार्क पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मनसे कार्यकर्ते आक्रमक
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळतात मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून हल्लेखोरांना बघून घेऊ, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.