Kolhapur News: आयुष्याच्या शैक्षणिक भवितव्याचा पाया रचणाऱ्या दहावीच्या निकालाची उत्सुकता फक्त पाल्याच्या आई बाबांनाच असते असे नव्हे, तर मित्रमंडळींनासुद्धा असते. आपलं लेकरू किती टक्के मार्क काढणार हे त्याच्या आई बाबांपेक्षा त्यांचा मित्र परिवार खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतो, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळे मित्र परिवारात एखादा चांगल्या गुणांनी पास होत असेल तर त्याची चर्चा होतेच, पण एखादा काठावरील असेल, तर त्याचीही चर्चा होत असते. अर्थात गुण हेच अंतिम साध्य नाही हेसुद्धा लक्षात ठेवणं क्रमप्राप्त आहे. 


भविष्यवाणी करणारे तोंडावर पडले


कोल्हापूर शहरात अशीच एक घटना आज घडली. समर्थ सागर जाधव या दहावीतील विद्यार्थ्याची निकालाची त्याला जशी उत्सुकता होती, तशीच त्याच्या शालेय मित्रांना सुद्धा होती. कारण वर्षभरातील त्याचा अंदाज घेत मित्रांनी तू नापास होणार असेच ठरवून टाकले होते. मात्र, आज जाहीर झालेल्या समर्थने आपण निकालात 'समर्थ' असल्याचे दाखवून देत 51 टक्के गुण मिळवून पास झाला. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याची भविष्यवाणी करणारे तोंडावर पडले. 


गंगावेश परिसरात मित्रांनीच काढली उंटावरून मिरवणूक 


समर्थ पास झाल्याचे त्याच्या मित्रांनी एकच जल्लोष केलाच, पण भावड्याला गुलाला न्हाऊन काढत थेट उंटावरून मिरवणूक काढली. त्यामुळे शंभर नंबरी मार्क घेऊन पास झालेलेसुद्धा उंटावर बसलेल्या भावड्याकडे पाहतच राहिले. त्याची कोल्हापूर शहरातील गंगावेश परिसरात मित्रांनी त्याची उंटावरून मिरवणूक काढत जंगी सेलिब्रेशन केले. समर्थ कोल्हापुरातील एस. एम. लोहिया हायस्कूलमधील विद्यार्थी आहे. मित्रांनी पास होणार नाहीस असे वर्षभर चिडवले, मात्र पास होताच मित्रांनीच उंटावरून मिरवणूक त्याचा 51 नंबरी निकाल यादगार करून टाकला. त्यामुळे कोल्हापुरात प्रत्येक विषय हार्डच का असतो, याची प्रचिती पुन्हा आली. 


दहावीच्या निकालात लातूरची भरारी


दरम्यान, यंदा राज्यातील दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल 96.73 टक्के लागला आहे. यावर्षी निकालाचा टक्का चांगलाच घसरल्याचे दिसून आलं आहे. राज्यात 151 विद्यार्थी हे शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यामधील तब्बल 108 विद्यार्थी एकट्या लातूर विभागातील आहेत. लातूर शहरातील केशवराज विद्यालयातील 11 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी 100 टक्के गुण घेतले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या