Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत झालेल्या तरुणाच्या खूनाचा कोल्हापूर (Kolhapur News) पोलिसांच्या (Kolhapur Police) स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या 24 तासात छडा लावण्यात आला आहे. आयफोन मागितल्याने रागाच्या भरात वडिलांसह भावानेच खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरसिंह दत्ताजीराव थोरात अस खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोल्हापूर एलसीबीनं मयत अमरसिंहचे वडिल दत्ताजीराव थोरात आणि भाऊ अभिजित थोरात या दोघांना जेरबंद केलं आहे.  सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावचे थोरात रहिवासी आहेत. 


कागल निढोरी राज्य मार्गावर बामणी (ता. कागल) हद्दीतील शेतामध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. यावेळी डोक्यात प्रहार केल्याचे दिसून येते होते. त्यामुळे खून अन्य ठिकाणी करून मृतदेह आणून टाकल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. कोल्हापुरात तो लाॅ कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत होता. तत्पूर्वी, मयत अमरसिंह थोरात पुण्यात एमपीएससीचा अभ्यास दहा वर्षांपासून करत होता. त्यानंतर त्याने घरातून अभ्यास सुरु केला होता. मात्र, यश न आल्याने कोल्हापुरात त्याने वकिलीचं शिक्षण सुरु केलं होतं. 


अमरसिंह दारुच्या आहारी गेल्याने वाद


दरम्यान, अमरसिंह दारुच्या आहारी गेल्याने घरात सातत्याने भांडणे होत होती. अमरसिंहने आयफोन घेण्यासाठी वडिलांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, त्याला पैसे देण्यास वडिलांनी नकार दिला होता. यामुळे घरात वाद झाला होता. याच वादातून वडिलांनी घरामध्ये अमरसिंहच्या डोक्यात लोखंडी पाईप घातली. या मारहाणीत  प्रचंड रक्तस्रावाने अमरसिंहचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी घाबरून रस्त्या शेजारी मृतदेह टाकला होता. 


शिवाजी पेठेत पाठलाग करून तरुणावर तलवार हल्ला


दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच कोल्हापुरात (Kolhapur Crime) पूर्ववैमनस्यातून प्रकाश बबन बोडके (वय 24, रा. फुलेवाडी, कोल्हापूर) याच्यावर तलवारीने तिघांनी जीवघेणा हल्ला केला होता. बुधवारी (31 मे) दुपारी दोनच्या सुमारास शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात ही घटना घडली होती. जखमी बोडकेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिन्ही हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. तलवार घेऊन आल्याचे दिसताच प्रकाश जीव वाचवण्यासाठी धावत सुटला. एका दुकानात शिरल्यानंतर त्याला बाहेर काढत हल्लेखोरांनी तलवारीने त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात हाताला आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या. हल्ला करून हल्लेखोरांनी पळ काढला होती. 


इतर महत्वाच्या बातम्या