Samarjitsinh Ghatge Vs Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. मला पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, असे आव्हानच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांना दिले आहे. याला समरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रावणाला देखील अशाच प्रकारे अहंकार होता, त्यामुळे कागलची जनता ठरवेल की त्यांना रामराज्य हवे आहे की नको? अशा शब्दात नवोदिता घाटगे यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला.


समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना पराभूत करूनच आमदार होणार असल्याच वक्तव्य केले होतं. त्यावर मुश्रीफ यांनी मला पडणारा जन्माला यायचा आहे अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, समरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांचा हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते प्रकाश गाडेकर यांनी एकेरी उल्लेख केल्याच्या विरोधात आज कागलमध्ये मोर्चा काढून निषेध करण्यात आला. मुश्रीफ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून प्रकाश गाडेकर यांचा पुतळा जाळण्यात आला. 


या मोर्चामध्ये हसन मुश्रीफ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. त्यामुळे कागलमधील राजकीय वातावरण तापलं आहे. त्याबाबत मुश्रीफ यांनी आम्ही महिलांचा आदरच करतो. आम्ही अस काही बोललो नाही, समरजितसिंह घाटगे अपरिपक्व आहेत ते अशा गोष्टींच राजकारण करत आहेत, अशी टीका  केली.


अनेकदा एकेरी उल्लेख केल्याचा नवोदिता घाटगेंचा आरोप 


हा प्रकार पहिलाच नसून यापूर्वी अनेकदा मुश्रीफ गटाकडून एकेरी उल्लेख झाल्याचा आरोप नवोदिता घाटगे यांनी केला. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशाप्रकारे करत असाल तर हे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकेरी उल्लेख झाल्याने महिलांना वाईट वाटल्याने त्यांनीच हा मोर्चा काढल्याचे त्या म्हणाल्या. आम्ही कधीही मुश्रीफ यांचा उल्लेख केला नसल्याचा दावाही त्यांनी केला. हसन मुश्रीफ जे बोलतात तेच त्यांचे कार्यकर्ते बोलतात असा आरोपही नवोदिता घाटगे यांनी केला.


इतर महत्वाच्या बातम्या