Kolhapur Rain Update : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर होत असलेल्या धुवाँधार पावसाने मोसमात दुसऱ्यांदा पंचगंगा नदी (panchganga river) पात्राबाहेर पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आज सकाळी 12 वाजेपर्यंत 31 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 


बंगालच्या उपसागरासह ओडिशा व आंध्र प्रदेश किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यांमध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु आहे. सर्वदूर पाऊस होत असल्याने सर्वच जिल्ह्यातील प्रमुख धरणे तसेच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर् देण्यात आला आहे. 


कोल्हापूरसह राज्यामध्ये जवळपास गुरुवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दमदार पावसाने पंचगंगा पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे आज सकाळी पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्राबाहेर आली. कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या परिसरातील 31 बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेली आहेत.


कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याखालील बंधारे



  • पंचगंगा नदी - इचलकरंजी,राजाराम,सुर्वे,रुई,इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ

  • दुधगंगा नदी - दत्तवाड

  • वेदगंगा नदी - वाघापूर,निळपण,शेणगांव,म्हसवे,गारगोटी, कुरणी,बस्तवडे,चिखली, 

  • कुंभी नदी - कळे, शेणवडे, मांडूकली

  • तुळशी नदी -बीड

  • भोगावती - हळदी, राशिवडे

  • वारणा - चिंचोली 


राधानगरी धरण 86 टक्के भरले


राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार राधानगरी धरण 86 टक्के भरले आहे. राधानगरी धरणात 203.112 दलघमी पाणीसाठा झाला आहे. धरणातून 1600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 


गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 117.3 मिमी पाऊस 


गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. तालुक्यात  117.3 मिमी पावसाची नोंद झाली, तर सर्वात कमी शिरोळ तालुक्यात 18.1 मिमी पावसाची नोंद झाली.  



  • हातकणंगले 34.2

  • शिरोळ 18.1

  • पन्हाळा 71.1

  • शाहूवाडी 90

  • राधानगरी 65.5

  • गगनबावडा 117.3

  • करवीर 57.8

  • कागल 44.6

  • गडहिंग्लज 44.7

  • भुदरगड 84.4

  • आजरा 84.2

  • चंदगड 79.1