PKL9 auction : राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत मैदान मारूनही राज्यातील खेळाडूंची प्रो कबड्डीच्या 9 व्या हंगामातील लिलावात बोळवण झाली आहे. लिलावामध्ये विशेष करून हरियाणामधील खेळाडूंनी बाजी मारली आहे. उल्लेखनीय म्हणजे मागील महिन्यात झालेल्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने हरियाणाला हरवूनही महाराष्ट्रातील खेळाडूंना लिलावात म्हणावी तशी संधी मिळालेली नाही.
राज्यातून 30 खेळाडू लिलावातून करारबद्ध झाले आहेत. तुलनेत हरियाणातील तिप्पटीहून अधिक म्हणजेच शंभरावर खेळाडूंना संधी मिळाली आहे. राज्यातून प्रो कब्बड्डीमध्ये बंगाल वाॅरियर्समध्ये 6 राज्यातील खेळाडू आहेत. पुणेरी पलटन (9), बंगळूर बुल्स (4), यु मुंबा (3), तमिळ थलायवाज (1), गुजरात जायटंस (3), तेलुगू टायटन्स (1), जयपूर पिंक (1) दबंग दिल्ली (1), पाटणा पायटर्स (1) अशा 30 खेळाडूंची लिलावातून निवड झाली आहे.
कोल्हापूरचा सिद्धार्थ देसाई कोटीतून आला अवघ्या 20 लाखांवर
कोल्हापूरकर रेडर सिद्धार्थ देसाईला (Raider Siddarth Desai) शुक्रवारी मुंबईत प्रो कबड्डी लीग सीझन 9 लिलावाच्या पहिल्या दिवशी तेलुगू टायटन्सने (Telugu Titans ) 20 लाख रुपयांना पुन्हा करारबद्ध केले, ही त्याची आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आहे. सिद्धार्थने पीकेएलमध्ये पदार्पण 6 व्या हंगामामध्ये केले होते. यू मुंबाने त्याला 36.4 लाख रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले होते. 'बाहुबली' नावाने परिचित असलेल्या सिद्धार्थने 21 सामन्यांमध्ये 218 रेड पॉइंट्स मिळवले होते.
त्यामुळे सिद्धार्थच्या कामगिरीने प्रभावित होऊन, तेलुगू टायटन्सने सीझन 7 च्या लिलावात आपला पेटारा उघडताना तब्बल 1.45 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. ज्यामुळे तो त्यावेळच्या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. टायटन्ससोबतच्या पहिल्या कारकिर्दीत, त्याने 22 सामन्यांमध्ये 217 रेड केल्या. तथापि, टायटन्सने 2021 च्या लिलावापूर्वी त्याला रिलीज केले होते.
सीझनच्या 8 व्या लिलावामध्ये, यूपी योद्धांनी (UP Yoddhas) सिद्धार्थ देसाईसाठी 1.30 कोटी रुपयांची बोली लावली. परंतु, तेलुगू टायटन्सने फायनल बीड मॅच कार्डचा वापर करत पुन्हा करारबद्ध केले होते. मात्र, दुर्दैवाने, 2021 च्या हंगामा फक्त तीन सामने खेळल्यानंतर मनगटाच्या दुखापतीमुळे त्याला फटका बसला आहे.
नवोदित खेळाडू म्हणून तेजस पाटीलला 7 लाखांची बोली
कोल्हापूरच्या तेजस पाटीलला (Tejas Patil) दिल्ली दबंगने 7 लाख रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले आहे. कबड्डीतील कौशल्याच्या जोरावर यंदा नवोदित खेळाडू म्हणून दिल्ली दबंग संघात स्थान मिळाले आहे. तेजस मूळचा सडोली खालसा येथील आहे.