कोल्हापूर : राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी फूट पाडल्यानंतर शरद पवार यांनी पक्षबांधणीसाठी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. शरद पवार शुक्रवारपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर असणार आहेत. शरद पवार यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी आमदार रोहित पवार सुद्धा आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते आज आणि उद्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेणार आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय या बैठका असतील. 


कसा असेल दौऱ्याचा कार्यक्रम?


आमदार रोहित पवार आज (23 ऑगस्ट) सकाळी 11 ते 1 या वेळेत गारगोटीमध्ये बैठक घेतील. या बैठकीमध्ये भुदरगड, राधानगरी तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी होतील. त्यानंतर दुपारी गडहिंग्‍लज, आजरा, चंदगड तालुक्यातील  कार्यकर्त्यांची गडहिंग्‍लजमध्ये बैठक होईल. त्यानंतर इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळमधील कार्यकर्त्यांची इचलकरंजीत बैठक होईल. दरम्यान, इचलकरंतीत पंचगंगा नदीकाठावरून रॅली काढली जाणार आहे. इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातून सभेसाठी अडीच हजारांवर कार्यकर्ते जातील, असे नियोजन करण्यात आले आहे. किणी टोल नाक्याजवळ पवार यांचे इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करीत रॅली काढली जाणार आहे. ताराराणी पुतळा येथे पवार यांना क्रेनद्वारे 30 फुटांचा हार घालण्यात येणार आहे. 


उद्या कोल्हापुरात असणार 


रोहित पवार उद्या सकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. दर्शनानंतर शिवाजी स्‍टेडियम येथील राष्‍ट्रवादीच्या कार्यालयात पत्रकार परिषद होईल. त्यानंतर करवीर, कोल्‍हापूर शहर व गगनबावडा येथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 


जयंत पाटलांकडून सभेच्या तयारीचा आढावा 


दुसरीकडे, ज्या राष्ट्रवादीची स्थापना कोल्हापुरातून झाली त्याच ठिकाणी फुटीनंतर प्रथमच शुक्रवारी बैठक होत आहे. या सभेच्या तयारीचा आढावा दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला होता. सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले असता आमदार पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने लढावे, अशी आमची इच्छा असल्याचे सांगत दोन्ही मतदारसंघावर दावा केला. 


जयंत पाटील पुढे म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकर यांचे पुरोगामी विचार घेवून शरद पवार काम करत आहेत. मात्र ज्यांना हे विचार मान्य नाहीत, त्यांनी पवारांपासून फारकत घेतली आहे. पवार यांच्या राज्यभर सभा होणार असून सर्व संभ्रम दूर होतील. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत आपणास काही माहिती नसल्याचेही आमदार पाटील यांनी स्‍पष्‍ट केले. शाहू महाराज राष्ट्रवादीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी असतील. 


इतर महत्वाच्या बातम्या