Kolhapur News : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर झालेल्या संचलन सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाला (Maharashtra Chitrarath 2023) द्वितीय क्रमांक मिळाला होता. हा रथ नारीशक्तीवर आधारित होता. हा रथ साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या कोल्हापूरमध्ये (Maharashtra Chitrarath 2023 In Kolhapur) पाहण्यासाठी मिळणार आहे. साडेतीन शक्तीपीठावर आधारित चित्ररथाचे प्रदर्शन सर्वप्रथम कोल्हापूर (Kolhapur News) येथे होणार असून या मार्गिकेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.
कर्तव्यपथावर झालेल्या संचलन सोहळ्यात महाराष्ट्राचा सहभाग अत्यंत नेत्रदीपक ठरला होता. महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठे नारिशक्ती या चित्ररथाने सर्व उपस्थितांची आणि हा सोहळा दूरवर पाहणाऱ्या जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकत सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी व्दितीय क्रमांक पटकावला होता. या चित्ररथाचे महाराष्ट्रात सर्व स्तरातून कौतुक झाले. या साडेतीन शक्तीपीठावर आधारित चित्ररथाचे प्रदर्शन सर्वप्रथम कोल्हापूर येथे होणार आहे. या मार्गिकेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रविवार 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता भवानी मंडपात होईल. त्यामुळे चित्ररथाचा देखावा महाराष्ट्रातील साडतीन शक्तीपीठांना भेट देणाऱ्या भाविकांना, सर्वसामान्यांना पाहता येण्यासाठी चित्ररथाचे सर्वप्रथम प्रदर्शन कोल्हापुरातून होणार आहे.
चित्ररथाचे मार्गक्रमण याप्रमाणे असणार
भवानी मंडप ते सीपीआर चौक (सकाळी 10 ते 11), सीपीआर चौक ते दसरा चौक (11 ते 12), दसरा चौक ते ताराराणी चौक (दुपारी 12 ते 1) आणि ताराराणी चौक ते शिवाजी विद्यापीठ (दुपारी 1 ते 2) असा असेल.
उत्तराखंडच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक
प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्यांमध्ये उत्तराखंडचा चित्ररथ पहिल्या क्रमांकावर राहिला. महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला. उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला. 17 राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिला.‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’यावर अधारित चित्ररथ होता. या चित्ररथासमोर गोंधळी होते. गोंधळींचं प्रमुख वाद्य संबळ दाखवलेलं होतं. आहे. तुळजाभवानीचे गोंधळी चित्ररथाच्या समोर होते. मागे साडेतीन शक्तीपीठं म्हणजेच कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा दाखवण्यात आला होता. ही सगळी शक्तीपीठं म्हणजे नारीशक्तीचा सन्मान होय. महाराष्ट्राची लोककला या ठिकाणी सादर करण्यात आली होती.
इतर महत्वाच्या बातम्या