Hasan Mushrif : कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ समजले जाणाऱ्या कागल (Kagal) तालुक्यात हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांच्यातील संघर्ष दिवसागणिक अधिकच टोकदार होत चालला आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. शेकडोंच्या संख्येने एकत्रित येत या कार्यकर्त्यांनी आज मुरगूड पोलिस ठाण्यासमोर मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे तालुक्यामध्ये राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
दरम्यान, यावेळी वातावरण तणावपूर्ण होत चालल्याने पोलिसांनी (Kolhapur Police) अतिरिक्त कुमक मागवली आहे. मुश्रीफ यांच्या समर्थकांकडूनही त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणाऱ्या विवेक कुलकर्णीसह इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता परस्पर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. काल (24 फेब्रुवारी) रात्रीही मुरगूड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांकडून ठिय्या मांडण्यात आला होता. तसेच या घटनेचा जाब विचारण्यात आला होता. मात्र आज (25 फेब्रुवारी) शेकडोच्या संख्येने समर्थकांनी एकत्र येत मुरगूड पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली आणि प्रचंड घोषणा दिल्या. त्यामुळे आता दोन्ही गटातील वाद दिवसागणिक वाढत चालला आहे.
मुश्रीफांनी 40 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप
दरम्यान, सन 2012 ते आजअखेर हा गुन्हा घडल्याची फिर्याद देण्यात आली आहे. मुश्रीफ यांनी 2012 मध्ये कारखाना उभारणीसाठी सभासद, भागधारक होण्याचे आवाहन केले होते. त्यातून लोकांकडून दहा हजार रुपयांप्रमाणे शेअर भांडवल घेतले व सुमारे 40 कोटींची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदार विवेक कुलकर्णीं यांच्यासह अन्य सभासदांना महिन्याला पाच किलो साखर, तसेच लाभांश रूपात अन्य आर्थिक लाभ मिळतील, अशी प्रलोभने दाखविण्यात आली. कारखाना सुरू झाल्यावर साखर कार्ड बिगर ऊस उत्पादक या सदराखाली देण्यात आले. विवेक कुलकर्णी व साक्षीदार यांना कोणतीही पावती, शेअर सर्टिफिकेट दिले नाही. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता त्यांना सरसेनापती शुगर ‘एलएलपी’ या नावाने पोच पावत्या देण्यात आल्या.
‘नॉन क्युम्युलेटी व प्रेफरेंशियल शेअर्स’ या सदराखाली या पोच पावत्या दिल्याचे दिसून आले. कारखाना उभा करताना रोख, धनादेश स्वरूपात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कागलमधील शाखा क्रमांक एक व दोनमधून त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यक्तिगत तसेच सरसेनापती शुगर पब्लिक लिमिटेड (नियोजित)च्या नावाने आमच्याकडे भाग देतो, असे सांगून पैसे गोळा केलेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या