कोल्हापूर : पावसाने ओढ दिल्यास खरीपाच्या पिकांना धोका पोहोचू नये, यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दूधगंगा व अन्य धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा, वारणा, राधानगरी व तुळशी या धरण प्रकल्पांच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात घेण्यात आली. खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे उभ्या पिकांसाठी पाण्याची मागणी होत आहे. बैठकीत वारणा, राधानगरी, तुळशी धरणांच्या पाणीसाठ्याचेही नियोजन करण्यात आले. या तीन धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे.
पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, हवामान खात्याचा अंदाज विचारात घेऊन खरीप हंगामात येत्या 8 दिवसात आवर्तन द्यावे. तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करुन जिल्ह्यात टंचाई परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी पाण्याचा वापर कमीत कमी करुन पाण्याची बचत करावी. केसरकर यांनी सांगितले की,दुधगंगा धरणाची गळती व दुरुस्तीबाबतच्या प्रस्तावास लवकरात लवकर मंजूरी मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल. बंधार्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी उपाययोजना करा.
परंतु संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करुन पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यात पुरेसे पाणी उपलब्ध असून ऊस क्षेत्र सुद्धा अधिक आहे. शेतकऱ्यांनी ऊस पिकांमध्ये जनावरांसाठी मका (मुरघास) चारा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी जलसंपदा व कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, तसेच हा चारा शासनाच्या वतीने विकत घेऊन राज्यातील अन्य दुष्काळी भागांतील जनावरांना पुरवता येईल यामुळे शेतकऱ्यांनाही उत्पन्न मिळेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दूधगंगा धरणाची गळती व धरणातील पाणीसाठा आणि पाण्याच्या मागणीबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच पाण्याच्या पुनर्वापराचे नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील चिकोत्रा, नागणवाडी व आंबेओहोळ प्रकल्पांच्या पाणी नियोजनाच्या बैठका तातडीने घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
सध्या दूधगंगा धरणात 20.09 मिली म्हणजे 84 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी 10.78 टीएमसी पाणी दूधगंगा खोऱ्यातील डावा, उजवा कालवा व नदीद्वारे सिंचनासाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच धरणातून कोल्हापूर शहरासाठी 2 टीएमसी व पंचगंगा खोऱ्यातील सिंचनासाठी 3.02 टीएमसी पाणी वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कर्नाटक राज्याच्या वाट्याच्या 4 टीएमसी पाण्यापैकी 2.87 टीएमसी पाणी कर्नाटक राज्याला दिले जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या