Nagpur-Ratnagiri National Highway : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील डोणोलीत (ता. शाहूवाडी) गुरुवारी झालेल्या शिबिरामध्ये वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहिल्याने बाधित शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांची एजंटांकडून लूट होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. तक्रार निवारण शिबिरासाठी आलेल्या दुय्यम कनिष्ठ अधिकाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे संपादित जमिनीचा मोबाईल मिळाला नसताना महामार्गाच्या कामात सुरुवात झाल्याने बोरपाडळे  (ता. पन्हाळा) येथील शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. 


विशेष भूसंपादन कार्यालयाकडे कागदपत्रांची पूर्तता करूनही शेतकऱ्यांना अनेक फेऱ्या माराव्या लागत आहेत. याचा गैरफायदा घेणाऱ्या कमिशन एजंटांनी भूसंपादन कार्यालयाचा ताबा घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी तक्रार निवारण करताना डोणोली क्षेत्रातील बाधितांची 75 टक्के भरपाई रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा झाल्याचे सांगत उर्वरित 25 टक्के रक्कम संबंधितांच्या अंतर्गत वादाने न्यायालयीन बाबींमुळे प्रलंबित राहिले सांगितले. (Nagpur-Ratnagiri National Highway) कागदपत्रे जमा केलेल्यांची पुढील एक आठवड्यात भरपाई रक्कम वर्ग केली जाईल असेही अधिकाऱ्यांनी  यावेळी सांगितले. 


पन्हाळा तालुक्यात काम बंद पाडले 


दरम्यान नागपूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीचा मोबाईल मिळाला नसताना महामार्गाच्या कामात सुरुवात झाल्याने बोरपाडळे  (ता. पन्हाळा) येथील शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. संपादित जमिनीचा मोबदला मिळत नाही तोवर महामार्गाचे काम सुरू करू देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. रत्नागिरी ते नागपूर महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा ते चौकाक दरम्यान जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. काही शेतकऱ्यांचा निवाडे पूर्ण होऊन संपादित जमिनीचा मोबदला खात्यावर जमा झाला आहे. मात्र,  बोरपाडळेतील शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. 


दुसरीकडे, जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम वाटप करण्याकरिता गावनिहाय शिबीर आयोजित करण्यात आले आहे.


गावनिहाय शिबीर याप्रमाणे (कंसात तालुका)



  • 31 डिसेंबर - पडवळवाडी (करवीर), केर्ले (करवीर), निगवे दुमाला (करवीर), जाठारवाडी (करवीर)

  • 2 जानेवारी - करुंगळे (शाहुवाडी), येलूर (शाहुवाडी), जाधववाडी (शाहुवाडी), पेरीड (शाहूवाडी)

  • 3 जानेवारी - भैरेवाडी (शाहुवाडी), गोगवे (शाहुवाडी), ठमकेवाडी (शाहुवाडी), बांबवडे (शाहूवाडी)

  • 4 जानेवारी - चनवाड (शाहुवाडी), कोपार्डे (शाहुवाडी), केर्ले (शाहुवाडी), तळवडे (शाहुवाडी)


इतर महत्वाच्या बातम्या