Kolhapur News: केंद्र सरकारकडून वितरित करण्यात येत असलेल्या मोफत धान्याचे कमिशन मिळावे, तसेच ते कोण देणार, याकडे लक्ष वेधण्यासाठी 7 ते 9 फेब्रुवारीदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) 1500 रेशन दुकाने तीन दिवस बंद ठेवली जाणार आहेत. राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानारक महासंघाचे सचिव चंद्रकांत यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे. चंद्रकांत यादव म्हणाले की, ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षेअंतर्गत प्रति व्यक्ती 5 किलो धान्य आणि अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिकार्ड 35 किलो धान्य देण्याची योजना वर्षभर सुरू राहणार आहे. वाटप झालेल्या धान्यावर कमिशन किती दिलं जाईल, याची माहिती दिलेली नाही. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. वितरकांना त्यांचे कमिशन मिळाले पाहिजे. यासाठी 7 ते 9 फेब्रुवारीदरम्यान देशव्यापी रेशन दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. 


या योजनेबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना नाहीत. आठ महिन्यांमध्ये कमिशन मिळालेले नाही. यामुळे रेशन दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच हा डाव रेशन व्यवस्था खुली करण्याचा दिसत आहे. दिल्लीत 22 मार्चला संसदेवर महामोर्चा काढला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


धान्य वर्षभर मोफत देण्यात येणार


कोल्हापूर जिल्ह्यात अंत्योदय (Antyodaya Anna Yojana- AAY) आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत दरमहा मिळणारे धान्य वर्षभर मोफत देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाची कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून अंमलबजावणी होईल. अंत्योदय योजनेसाठी 1 हजार 36.18 टन तांदूळ, 777.13 टन गहू, प्राधान्य गटासाठी 6 हजार 393.84 टन तांदूळ आणि 4 हजार 262.56 टन गहू दर महिन्याला वितरित केला जाणार आहे.


राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढच्या एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा देशभरातील 81 कोटीहून अधिक नागरिकांना होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकांना दर महिन्याला दोन ते तीन रुपयामध्ये 5 किलो अन्नधान्य दिले जातात. अंत्योदय अन्न योजनेच्या अंतर्गत (Antyodaya Anna Yojana- AAY) येणाऱ्या कुटुंबाना दर महिन्याला 35 किलोग्रॅम अन्नधान्य देण्यात येतात.  


केंद्र सरकारने 31 डिसेंबर रोजी संपणाऱ्या राष्ट्रीय अन्न सुरक्षांतर्गत मोफत रेशनच्या योजनेला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पुढच्या डिसेंबरपर्यंत ही मोफत अन्नधान्याची योजना सुरू राहिल. दरम्यान, या वर्षाच्या 31 डिसेंबरला संपणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) मोफत रेशन योजनेला मात्र मुदतवाढ न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Kolhapur News : करवीर तहसील कार्यालय दोन दिवस बंद राहणार; 1 फेब्रुवारीपासून 'या' ठिकाणी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरु होणार