Raju Shetti : आधार कार्ड पॅन कार्डला लिंकसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात असली, तरी त्यासाठी सक्तीने आकारण्यात येत असलेल्या हजार रुपयावरून संताप व्यक्त केला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी हा जनतेच्या पैशावर दरोडा असल्याचा घणाघात केला आहे. राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, आयकर विभागाने देशातील 44 कोटींहून अधिक पॅनकार्ड ग्राहकांना आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅनकार्ड धारकांकडून आधार लिंक करण्यापोटी 1 हजार रूपयाचा जिजीया कर आकारला आहे. यामुळे देशातील जनतेवर 44 हजार कोटींचा दरोडा पडणार आहे. 


केंद्र सरकार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात कराची आकारणी करून वाढलेल्या महागाईच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. यामुळे या तुघलकी धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी रविवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत #स्टॅापरॅाबरी #stoprobbary हा संदेश ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पाठवायचा आहे. तसेच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या nsitharaman@nic.in या मेलवरती सदर धोरणाविरोधात आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 


जनतेच्या खिशावर डल्ला 


त्यांनी पुढे म्हटले आहे की, केंद्र सरकारने डिजीटल धोरणाच्या नावाखाली पॅनकार्ड धारक व्यक्तींनी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅनकार्ड धारकास 1 हजार रूपये खर्च येत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारून केंद्र सरकार तब्बल 44 हजार कोटी रूपयाचा दरोडा टाकत आहे. सध्या जनतेला कोणताही व्यवहार अथवा नोंदणी करत असताना आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं बंधनकारक करण्यात आलेला आहे. 


दरम्यान, केंद्र सरकारने केली असून आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. 30 जूनपर्यंत आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करता येणार आहे. याआधी ही मुदत 31 मार्च होती, आता ती वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत जरी वाढवली असली तरी दंड मात्र कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी त्यांचं आधार-पॅन अद्याप लिंक केलं नाही त्यांना 1000 रुपये भरून ते लिंक करता येणार आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या :