Raju Shetti On FRP : एकरकमी एफआरपी आणि शेतकऱ्यांच्या 50 हजार सानुग्रह मदतीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी निर्णायक इशारा दिला आहे. एकरकमी एफआरपी आणि दसऱ्यापूर्वी 50 हजारांची मदत मिळाली नाही, तर रस्त्यावरील लढाईला तयार राहावे, असा इशारा त्यांनी शिंदे सरकारला दिला.
यावर्षीची एफआरपी व ऊस दर लढाई ऐतिहासिक असेल, त्यासाठी टोकाचा संघर्ष करावा लागेल असे राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास लढा तीव्र करणार असल्याचे ते म्हणाले.
हातकणंगले तालुक्यातील कुंभोजमध्ये शेतकरी संघटनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळव्यामध्ये बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितले की, आता शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकवटली आहे. काही कारखानदारांकडून कारखाने चालू करण्याची भाषा करत आहेत, पण मागण्यांवर निर्णय होत नाही तोपर्यंत उसाच्या कांडाला हात घालून देणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.
ते पुढे म्हणाले की, 20 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या असणारे प्रश्न आणि आताचे प्रश्न यामध्ये फरक आहे, ऊसाला जरी भाव मिळत असला तरी सरकारकडून खते, बियाण्यांच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पैसा शेतकऱ्यांकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना तसेच महापुराने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असून चारचाकीने येणारे शेतकरी मेळाव्यासाठी ट्रकमधून येत आहेत हे त्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे त्यानी सांगितले.
केंद्र सरकारने एफआरपी कायदा लागू केला आहे, पण त्यामध्ये बदल करून राज्य सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की शेतकरी नुकसान करण्याचा सरकारचा घाट आहे. सगळीकडे डिजिटल माध्यमांचा वापर केला जात असताना साखर कारखान्याचे काटे मात्र साखर कारखान्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्यावर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे अशी मागणी त्यांनी साखर संचालकांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या