Raju Shetti : राज्यात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी खडे बोल सुनावले आहेत. एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाल्याचे राजू शेट्टी म्हणाले. राजू शेट्टी म्हणाले की, राज्यात बेमोसमी अवकाळी पाऊस आणि  गारपिटीमुळे राज्यात कांदा द्राक्ष, भोपळा, भाजीपाला, पेरु यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तळहातावरच्या फोडाप्रमाणे शेतकरी आपलं पीक जपत असतो, पण निसर्गाच्या फटक्याने होत्याचं नव्हतं होते. एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे. मुख्यमंत्रीसाहेब प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यायचं असेल, तर खुशाल घ्या. ती तुमची व्यक्तिगत बाब आहे. मात्र, राज्य प्रमुखाला व्यक्तिगत बाबींपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतात आणि कर्तव्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. 


त्यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका. ज्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला गेला आहात त्या प्रभू रामचंद्रानं प्रजेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं म्हणून आज जनता म्हणते रामाचं राज्य आलं पाहिजे. आणि तुमच्या राज्यात रामाचं राज्य निर्माण करायचं असेल, तर अडचणीत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या, एवढीच कळकळीची विनंती आहे. 


14 जिल्ह्यातील 28 हजार हेक्टर वरील पिकांचं नुकसान 


दरम्यान, राज्यातील तिसऱ्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) 14 जिल्ह्यातील 28 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यातील आठ हजार हेक्टर शेतातील उभ्या पीकांचे नुकसान झालं आहे. त्याखालोखाल नगर जिल्ह्यात 7 हजार 305  हेक्टरवर नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामध्ये फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. मका, कलिंगड, गहू, कांदा, हरभरा, या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.


दुसरीकडे, अवकाळी पावसाने शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मी अयोध्येतूनच दिले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे, तर शेती नुकसानीचे प्राथमिक अंदाज आमच्याकडे आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या