Kolhapur News : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय कोल्हापूरच्या (Kolhapur) दाम्पत्याला कार थेट 100 फुट खोल दरीत मध्यरात्री दोन वाजता आला. खोल दरीत कोसळूनही संयम न सोडता तातडीने 112 क्रमांकावरून माहिती दिल्याने अवघ्या 15 मिनिटात पोलिसांनी धाव घेत गाडीतून तिघांना सुखरुप बाहेर काढत जीव वाचवला. गाडी थेट दरीत कोसळल्यानंतर सरळ खाली गेल्याने मोठा अनर्थ टळला. देवरूख पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेनं दाम्पत्याचा जीव वाचला आहे. 


प्रसंग नेमका काय घडला? 


कोल्हापूरचे विनायक मढवळ (वय 33), पत्नी सिद्धी मढवळ (वय 32) आणि त्यांची मुलगी मीरा (वय 4) हे कारने (एमएच-09- एफजे-8972) रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून कोल्हापूरला येत होते. साखरप्यापासून पुढे 2 किमी अंतरावर मुरडे घाटात समोरून आलेल्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यावर पडल्याने विनायक यांना समोर रस्ता दिसून आला नाही आणि याच काही सेकंदामध्येच कार थेट 100 फूट खोल दरीत कोसळली. मात्र, आयुष्याची दोरी बळकट असल्याने सरळ खाली गेली. 


धैर्याने मदतीसाठी फोनाफोनी 


कार ज्यावेळी दरीत कोसळली त्यावेळी मध्यरात्री दोन वाजले होते. विनायक यांच्या पत्नी सिद्धी यांनी मोठ्या धैर्याने नातेवाईकांना आणि 112 नंबरवरून देवरूख पोलिसांना 8 एप्रिल रोजी 2 वाजून 9 मिनिटांनी सिद्धी मढवळ यांना माहिती देत आमचा अपघात झाला असून आम्हाला तत्काळ मदत हवी असल्याचे सांगितले. यावेळी देवरुख पोलिस ठाण्यात राहुल गायकवाड होते. ते सहकाऱ्यांसह 15 मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले. 


राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत नागवेकर, चालक पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पाटील अवघ्या 15 मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोरीच्या मदतीने दरीत उतरून प्रथम गाडीची डिकीतून मुलगी मीराला बाहेर काढले. त्यानंतर विनायक आणि सिद्धी यांना बाहेर काढून सुखरूप दरीतून बाहेर काढले. मध्यरात्री कोणीही मदतीला नसताना देवरूख पोलिसांच्या या मदतीमुळे मढवळ दाम्पत्याला अश्रु अनावर झाले. सुदैवाने या अपघातात तिघेही सुरक्षित आहेत.  


इतर महत्वाच्या बातम्या : 


Kolhapur News : लग्न ठरवण्यासाठी 15 दिवसांपूर्वीच सुट्टीवर आलेल्या जवानाची आत्महत्या; शेतात कुटुंबासोबत जेवण करून घरी आल्यानंतर टोकाचे पाऊल