Rajaram Sakhar Karkhana : महाडिक आणि सतेज पाटील गटाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झालेल्या राजाराम साखर कारखान्याचे राजकारण दिवसागणिक चांगलेच पेटत चाललं आहे. आता पुलाच्या शिरोलीत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे पडसाद सुद्धा आता उमटू लागले आहेत. त्यामुळे आता हे राजकारण ऊसाच्या फडापर्यंत पोहोचले आहे. पुलाची शिरोली ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात गेलेल्यांचा ऊस राजाराम कारखान्याला घेत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संदर्भात आता निवेदन देण्यात आल्याने पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.


बावड्यातील छत्रपती राजाराम कारखान्याकडून हातकणंगले तालुक्यात पुलाची शिरोली ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात गेलेल्या कारखाना सभासदांचा ऊस न नेता त्यांना अटकाव केला जात असल्याची तक्रार संबंधित ऊस उत्पादकांनी निवेदनाद्वारे केली आहे.


पत्रकात म्हटले आहे की, ऊसतोड हंगाम (Rajaram Sakhar Karkhana)भरात असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू होती. पुलाची शिरोलीत भाजपच्या महाडिक गटाने सत्ता मिळवली. महाडिक गटाने या निवडणुकीचे उट्टे राजारामच्या गळीत हंगामात काढण्यास सुरुवात केली आहे. गावच्या निवडणुकीत विरोधात गेलेल्यांचा ऊस तोडला जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिणामी, पुलाची शिरोलीमधील शेतकरी हवालदिल झाले आहेत.  पुलाची शिरोली गावात हजारो एकर ऊस आहे. हा ऊस राजाराम कारखान्याला जातो. सभासद असल्याने काहींना राजारामला ऊस घालवणे क्रमप्राप्त आहे, पण तोड देताना महाडिक गटाचे काम करणाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. 


मतदानाचा हक्क मिळाल्यानंतरच राजाराम कारखान्याची निवडणूक घ्यावी


दरम्यान, अर्हता दिनांकाच्या तांत्रिक अडचणीने राजाराम सहकारी साखर कारखान्याचे (Rajaram Sakhar Karkhana) काही सभासद मतदानापासून वंचित राहणार असल्याने मतदानाचा हक्क मिळाल्यानंतरच राजाराम कारखान्याच्या निवडणूका घ्याव्यात, अशा मागणीचे निवेदन सभासदांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांना दिले आहे. निवेदनातून प्रारूप व अंतिम मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट होण्यासाठी निश्चित केलेली 31 ऑक्टोबर तारीख बदलून 31 मार्च 2023 करावी, अशी विनंती केली आहे. अन्यथा मतदानाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणल्याबद्दल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


निवेदनात पुढे म्हटले आहे की, राजाराम कारखान्यासाठी मतदारयादी तयार करण्यासाठी 31 ऑक्टोबर ऐवजी 31 मार्च 2023 करावी. प्रारूप मतदारयादी तयार करण्यासाठी निश्चित केलेल्या 31 ऑक्टोबरच्या आदेशान्वये कारखान्याने मतदारयाद्या तयार केल्यास आम्हाला मतदानाचा मुलभूत कायदेशीर हक्क बजावता येणार नाही व असंख्य सभासद संस्थेच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत.


कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करा 


दुसरीकडे, काही सभासदांनी राजाराम कारखान्याची निवडणूक प्रक्रिया ताबडतोब सुरु करण्याची मागणी प्रादेशिक सहसंचालक (साखर)  यांच्याकडे केली आहे.  निवडणुकीला उशीर होत असेल, तर कारखान्यावर प्रशासक नेमा, अशीही मागणी केली आहे. कारखान्याच्या विद्यमान संचालकांची मुदत संपून पावणे तीन वर्ष झाली आहेत, शेतकऱ्यांचे हित पाहून निवडणूक प्रक्रिया सुरु करा, अशी मागणीही  सभासदांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या