Rajaram Sakhar Karkhana : निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि अत्यंत टोकदार अशा झालेल्या प्रचाराने अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निकालामध्ये सत्ताधारी महाडिक गटाने पुन्हा एकदा बाजी मारत सत्ता अबाधित राखली आहे. महाडिक गटाने कारखान्याच्या सर्वच्या सर्व 21 जागांवर विजयी घौडदौड सुरु केली आहे. मतमोजणी फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आज रात्री उशिरा अंतिम निकालावर औपचारिक शिक्कामोर्तब होईल. निवडणुकीमध्ये कंडका पाडायचाच या स्लोगनने प्रचारामध्ये उतरलेल्या विरोधी परिवर्तन आघाडीचा पुरता धुव्वा महाडिक आघाडीने उडवला. सर्वच्या सर्व जागांवर महाडिक आघाडीने विजयी घौडतोड सुरू केली आहे. ज्या ताकदीने विरोधी आघाडीकडून प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे महाडिकांच्या सत्तेला सुरूंग लागतो की काय? अशी शंका कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये वर्तविण्यात येत होती. मात्र, पुन्हा एकदा सभासदांनी सत्ताधाऱ्यांवर विश्वास दाखवला आहे.
त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सलग निवडणूक जिंकलेल्या सतेज पाटील यांना दारुण पराभवाचे तोंड पहावं लागलं आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर महाडिक आघाडीने सुरुवातीपासून घेतलेली आघाडी ही कायम राहिली. त्यांना कोणत्याही फेरीमध्ये ही आघाडी मोडता आली नाही. पहिल्या फेरीमध्ये जवळपास 800 ते 1000 मतांनी सर्वच उमेदवार महाडिक गटाचे उमेदवार आघाडीवर राहिले. तिच परिस्थिती दुसऱ्या फेरीत दिसून आली. पाटील यांचे होम ग्राउंड कसबा बावड्यामध्येही त्यांना मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणीही सुद्धा महाडिकांनी मतं घेतली आहेत. दुसरीकडे शिरोली पुलाची येथील महाडिकांच्या बालेकिल्ल्यामध्ये महाडिकांना भरपूर मतदान मिळाले. मात्र तुलनेत पाटील यांना तो किल्ला भेदता आला नाही.
हातकणंगले तालुका हा राजाराम कारखान्यासाठी निर्णायक होता. या तालुक्यामधून मोठे मताधिक्य आणि तसेच इतर मोठ्या गावांमधूनही मताधिक्य महाडिक आघाडीला मिळाले. आमदार विनायक कोरे, माने गट आवाडे गट यांचेही बळ सत्ताधारी महाडिक गटाला मिळाल्याने विजयी होण्यास मदत झाली. महादेवराव महाडिक यांनी त्यांचे आभार मानले. या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच आरोपांच्या फैरी झाल्या होत्या. मात्र, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर या निवडणुकीने टोक गाठले होते. एकमेकांना आव्हान त्याचबरोबर एकेरी उल्लेख करण्याची भाषा सुद्धा प्रचारांमध्ये दिसून आली. त्याचबरोबर हा वाद कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकापर्यंत येऊन पोहोचला होता. त्यामुळे या निवडणुकीमध्ये काय होते? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र, आता या निवडणुकीमध्ये महाडिक गटाने एकहाती सत्ता मिळवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विजय निश्चित झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक तसेच खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत पाटील यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.
इतर महत्वाच्या बातम्या