Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे, तर अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाने बाजी मारली आहे. गेल्या 28 वर्षांपासून असलेली सत्ता अबाधित राखण्यात सत्ताधारी महाडिक गटाला यश आलं आहे. प्रचंड आव्हान निर्माण केलेल्या आमदार सतेज पाटील यांच्या परिवर्तन आघाडीचा धुव्वा उडाला आहे. सत्ताधारी आघाडीचे नेते महादेवराव महाडिक यांनी सर्वांत पहिल्यांदा संस्था गटातून विजयी गुलाल उधळल्यानंतर महाडिक गटाने एकच जल्लोष केला. 9 पैकी 6 गटातून विजयाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांनी सतेज पाटलांवर कडाडून हल्लाबोल केला. तिघांनी सुद्धा अत्यंत आक्रमक भाषेत सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली.
माजी आमदार महादेवराव महाडिक काय म्हणाले?
महादेवराव महाडिक विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, हा कोल्हापूरच्या सर्वसामान्य सभासदांचा विजय आहे. विजयाचे श्रेय अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांना जाते. हा गरीब शेतकऱ्यांचा श्रीमंत कारखाना आहे. या विजयाने कोल्हापूरच्या राजकारणा वेगळी दिशा मिळणार आहे. या विजयात विनय कोरे, प्रकाश आवाडे, स्वरुप महाडिक सुद्धा राबले, त्यामुळे विजय खेचून आणला. महाडिकांकडे गोरगरीब हीच ताकद आहे. मी शेलारमामा आहे, माझ्या लांगेत कोणी बोटी घालण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी खूप पावसाळे बघितले पाहिजेत. धनंजय, अमल आहे त्यांना पहिल्यांदा सलामी द्या मग माझ्याकडे या. ज्यांना शड्डू मारायला येत नाही त्यांना शड्डू मारायला शिकवत आहेत. मी फुकून उडवून टाकेन.
विकृत मनोवृत्तीचे कंडके पाडले
खासदार धनंजय महाडिक यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना सतेज पाटील यांच्यावर बोचऱ्या भाषेत प्रहार केला. मनोरुग्णांचे अनेक कंडके पाडल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. ते म्हणाले की, कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. आता त्याचा निकाल समोर आला आहे. कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी द्वेष भावनेतून निवडणूक लावली. त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला आहे. चारित्र्यहनन होईल, अशा पद्धतीने सभासदांकडे जाऊन प्रचा केला. अमल महाडिक यांनी विकासात्मक बाबी समोर आणण्याचा प्रयत्न केला. विकास करून कारखाना विस्तारीकरण करु, को-जनरेशन प्रकल्प उभा करू, डिस्टीलरी प्रकल्प उभा करु आणि चांगला दर देऊ हा विश्वास दिला. सतेज पाटील यांनी खालच्या स्तरावर जाऊन प्रचार केला. सभासदांनी विकासाला कौल दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, माजी पालकमंत्री आणि त्यांचे मोठे बंधू यांनी सहकारातून ज्या संस्था बळकावल्या, त्यातून भ्रष्टाचार करून पैसा कमावला, डोनेशनच्या माध्यमातून जो पैसा मिळवला तो घेऊन सभासद विकत घेण्याचा प्रयत्न केला. राजारामच्या स्वाभिमानी जनतेनं त्यांना झिडकारलं आहे. सहकार टिकवण्यासाठी कौल दिला आहे. सत्तेत असताना माजी पालकमंत्र्यांची भाषा मग्रुरीची आणि मस्तीची भाषा होती. त्यांनी महाडिकांना गुलाल लागणार नाही, असे भासवण्याचा प्रयत्न केला. आता भविष्यात आम्हालाच गुलाल लागेल. सभासदांनी त्यांचे अनेक कंडके पाडलेत. नेस्तनाबूत करून टाकलं आहे.
पुन्हा सेवा करण्याची संधी दिली
आमदार अमल महाडिक म्हणाले की, गेल्या 27 वर्षांपासून जो विश्वास दाखवला होता तोच विश्वास दाखवत सभासदांनी पाच वर्ष सेवा करण्याची संधी दिली आहे. सभासदांनी आम्हाला स्वीकारलं आहे. हा त्यांचा विजय आहे. विरोधकांनी तिसऱ्यांदा प्रयत्न केला. पुन्हा महाडिकांच्या विरोधात विचार करून निवडणूक लढवावी, असा टोला त्यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या