Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्याच्या 29 अवैध उमेदवारांवरून प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली आहे. विरोधी गटाकडून पहिल्यांदा बाजू मांडण्यात आल्यानंतर सत्ताधारी गटाकडून गुरुवारी बाजू मांडण्यात आली. यामुळे आता अवैध ठरलेल्या उमेदवारांचे भवितव्य सोमवारी (10 एप्रिल) ठरणार आहे. दरम्यान, सत्ताधारी महाडिक गटाकडून 29 उमदेवारांना पोटनियमानुसार आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच त्यांची छाननी झाल्याची भूमिका गटाचे वकील लुईस शहा यांनी मांडली. प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्यासमोर दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला आहे. त्यामुळे निकालाकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राजाराम कारखाना निवडणूक जाहीर होण्यापासून चर्चेत आहे. जिल्ह्यातील दोन मातब्बर गटांनी कारखान्याच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे दररोज दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरु आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विरोधी गटातील 29 उमेदवार अवैध ठरल्यानंतर या संघर्षाला आणखी धार आली आहे. विरोधी आघाडीचे नेतृत्व करत असलेल्या आमदार सतेज पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता सोमवारच्या निकालानंतर प्रत्यक्ष लढतींचे स्वरुप स्पष्ट होणार आहे.
विरोधकांचा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही
दरम्यान, राजाराम कारखाना म्हणजे श्रमाचे मंदिर आहे. 28 वर्ष या मंदिरात आम्ही सर्व संचालक प्रामाणिकपणे सेवा देत आहोत. पण, काही स्वार्थी लोक सभासदांनी उभारलेले आणि जपलेले हे मंदिर बळकावू पाहत आहेत. त्यांचा हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही, मंदीरासारखा जपलेला हा कारखाना विरोधकांच्या ताब्यात देऊ नका, असे आवाहन माजी आमदार अमल महाडिक यांनी केले. करवीर तालुक्यातील गावांमधील सभासदांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. विरोधक केवळ सुडाच्या राजकारणातून बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी केले.
निवडणुकीत परिवर्तन आवश्यक
दुसरीकडे, शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या उसाला चांगला दर मिळावा आणि उसतोड वेळेत मिळावी ही भूमिका घेऊन राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत लढा उभारला आहे. सभासदाच्या हितासाठी परिवर्तन आघाडीला साथ द्या, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. राधानगरी तालुक्यात विविध गावांमध्ये आयोजित शेतकरी सभासदांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, सभासद हाच कोणत्याही संस्थेचा खरा मालक असतो. सभासदांच्या फायद्यासाठी संस्था कार्यरत असणे आवश्यक असते. कारखान्याचे खरे मालक असलेल्या सभासदांचा सन्मान राखण्यासाठी राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तन आवश्यक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :