Kolhapur News : नाबार्डच्या पुढाकाराने कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) भुदरगड तालुक्यात पाटगावमध्ये मध उद्योगासाठी, चंदगड तालुक्यात बसरगेत रेशीम उद्योगासाठी तसेच हातकणंगले तालुक्यात शेळीपालनासाठी तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून तिन्ही उद्योग व्यवसायाला चालना मिळून या कंपन्यांनी उत्कृष्ट काम करुन राज्यातील शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. यावेळी नाबार्डच्या वतीने कंपन्यांना मान्यता मिळाल्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.


नाबार्डच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली मध, रेशीम, शेळीपालनासाठीच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी रेखावार म्हणाले की, "मधमाशी पालन, रेशीम शेती, शेळीपालन आदी शेतीपूरक व्यवसाय हे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी महत्वपूर्ण आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा व पर्यायाने जिल्ह्याचा विकास साधला जाईल. तथापि, या तीनही कंपन्यांतील उत्पादनांचा दर्जा चांगल्यात चांगला राखला जाईल, यासाठी सुरुवातीपासूनच दक्षता घ्यावी. जेणेकरुन या उत्पादनांना विविध भागांतून मागणी वाढेल, उत्पादने सर्वदूर पोहोचतील व उत्तम दर मिळेल."


तिन्ही कंपन्यांसाठी सुमारे 30 लाख रुपयांचे अनुदान मंजूर


रेशीम शेती, मध उद्योग आणि शेळीपालन उद्योगाद्वारे रोजगार निर्मिती आणि लाभार्थ्यांची क्षमता वृद्धी व कौशल्य विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करुन ती चालवण्यासाठी नाबार्डच्या वतीने तिन्ही  कंपन्यांसाठी साधारण 30 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानातून कंपन्यांची नोंदणी, देखभाल तसेच कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळाच्या क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षणे, अभ्यास दौरे आयोजित करणे तसेच अन्य उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त उत्पादनांच्या ब्रँडिंग व मार्केटिंगसाठीही मदत केली जाणार आहे, अशी माहिती नाबार्डचे सहायक महाप्रबंधक आशुतोष जाधव यांनी दिली. 


संदेश जोशी यांनी पाटगाव येथील मध उद्योगाबाबत सादरीकरणातून माहिती दिली. या तीनही शेती उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी क्रेडाईच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शाहूपुरी येथे वर्षभरासाठी मोफत दुकानगाळा देण्यात येईल, असे क्रेडाईचे आदित्य बेडेकर यांनी सांगितले. 


यावेळी नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक आशुतोष जाधव, राज्य रेशीम समन्वय समितीचे सदस्य अधिकराव जाधव, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, कृषी विभागाचे उपसंचालक रवींद्र पाठक, जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी.एम.कांबळे, पशुसंवर्धन उपायुक्त वाय. ए. पठाण, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी दत्तात्रय कुरुंदवाडे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी, संदीप कुमार तसेच शेतकरी कंपन्यांचे प्रतिनिधी व संबंधित लाभार्थी, शेतकरी उपस्थित होते. 


इतर महत्वाच्या बातम्या