Karnataka Bhavan at Kaneri math : कणेरी मठात कर्नाटक भवनाच्या बांधकामाविरोधात शिवसेनेकडून आज आंदोलन करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कणेरी मठातील कर्नाटक भवनच्या बांधकामाला कडाडून विरोध होत आहे. 


काडसिद्धेश्वर महाराज हा मठ चालवतात. अलीकडेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि त्यांच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने कर्नाटक भवनसाठी पायाभरणी केली आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अत्याचारामुळे  शिवसेनेनं या निर्णयाला विरोध केला आहे. 


उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले म्हणाले की, आम्ही मठावर आंदोलन करणार आहोत. कर्नाटकचे नाव देण्याच्या कोणत्याही बांधकामाला आमचा पूर्ण विरोध आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येऊन महाराष्ट्रात कर्नाटक भवनाचे उद्घाटन करतात आणि आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प आहेत, हे चिंतेचे कारण आहे. आम्ही मठात केलेल्या कामांच्या विरोधात नाही, पण कर्नाटक भवन हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने अतिक्रमण आहे, असे आम्हाला वाटते, आम्हाला कोणत्याही इमारतीवर कर्नाटकचे नाव नको आहे.


दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी कोल्हापुरातील सिद्धगिरी कणेरी मठात कर्नाटक भवन उभारणीसाठी पायाभरणी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शशिकला जोल्ले आणि बोम्मई मंत्रिमंडळातील दहा मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. कर्नाटक भवनासाठी एकूण 7 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बोम्मई यांनी जाहीर केले की या कामासाठी तातडीने 3 कोटी रुपये दिले जातील. 


मठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्नाटक भवन हे विद्यार्थी, तज्ज्ञांसाठी सेवा देईल. ज्यांना या ठिकाणी राहून संशोधन करायचे किंवा मठात विकसित केलेल्या मॉडेल्सचा अभ्यास करायचा आहे त्यांना लाभ होईल. तसेच मठात मोठ्या संख्येने येणारे पर्यटक तसेच भाविक कर्नाटकातील आहेत ते देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.


कणेरी मठ काडसिद्धेश्वर महाराज चालवतात, जे देशी गायींच्या संवर्धनासाठी, सेंद्रिय शेतीसाठी ओळखले जातात. कणेरी मठावर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पर्यटक तसेच भाविक मोठ्या संख्येने येत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, अण्णा हजारे, योगगुरू बाबा रामदेव आणि इतर अनेक व्यक्तींनी यापूर्वी मठाला भेट दिली आहे.


कर्नाटक भवनला शिवसेनेनं कडाडून विरोध होत असल्याने कोल्हापूरमध्ये वाद वाढत जाण्याची चिन्हे आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या