Kolhapur News : सामाजिक सलोख्याचे अनेक पुरोगामी निर्णय घेत राज्याला सामाजिक दिशा आणि नेतृत्व देण्याचे काम कोल्हापूर जिल्ह्याने आजवर नेहमीच केलं आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या या भूमीत आता आणखी एका निर्णयाने कोल्हापूरची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली गेली आहे. आजही तृतीयपंथियांना समाज मोठ्या मनाने स्वीकारत नाही. मात्र, कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यात एका तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान देण्यात आला आहे. हुपरी नगरपरिषदेनं (Hupari Nagar Parishad) पहिल्यांदाच तृतीयपंथीयाला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान देत वंचित वर्गासाठी राजकीय मार्ग आणखी प्रशस्त केला आहे. 


हुपरी नगर परिषदेमध्ये आज सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये तृतीयपंथी असलेल्या व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. राज्यात तृतीयपंथीयाला पहिल्यांदाच अशा पद्धतीने मान मिळाला आहे. तातोबा हांडे उर्फ देव आई असं हुपरी नगरपरिषदेतील स्वीकृत नगरसेवकाचे नाव आहे.


तृतीयपंथी हा देखील आपल्या समाजाचा एक घटक आहे. मात्र, रूढी परंपरेमुळे तृतीयपंथीयांना समाजातून वगळण्यात येते. अशावेळी हुपरी नगर परिषदेने घेतलेला निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्शवत आहे.


ताराराणी पक्षाचे राहुल आवाडे यांनी या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, तृतीयपंथी समाजाच्या खूप समस्या आहेत. त्यांना अपमान सहन करून जगावं लागतं. जोगवा मागून आपल्या पोटाची खळगी भरतात, त्यामुळे यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न हुपरी नगर परिषदेने केला आहे. 


आम्ही देखील या समाजाचे एक घटक आहोत


संतोष धोत्रे, तृतीयपंथीने प्रतिक्रिया देताना सांगितले की, तृतीयपंथीयांना आपला समाज स्वीकारत नाही. मात्र, आम्ही देखील या समाजाचे एक घटक आहोत. किमान आता, तरी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळावा 


तृतीयपंथी निवडणुकीमधून अनेक सभागृहांमध्ये पोहोचले आहेत. मात्र, स्वीकृत नगरसेवक म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदाच तातोबा हांडे यांना मान देण्यात आला आहे. इथून पुढे प्रत्येक संस्थांमध्ये अशा पद्धतीने तृतीयपंथी यांना मान दिला, तर त्यांना देखील मुख्य प्रवाहात आणणे सोपे होऊन जाईल यात शंका नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या