कोल्हापूर : राज्यामध्ये महायुतीने एकहाती सत्ता मिळवताना दमदार यश मिळवलं आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा सिंहाचा वाटा राहिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील महायुतीच्या दहापैकी दहा जागा निवडून आल्या असून त्यामुळे मंत्रिपदामध्ये कोणाची वर्णी लागणार याचीच उत्सुकता सर्वाधिक लागून राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे सर्वाधिक तीन आमदार आहेत. भाजपचे दोन आमदार आहेत, तर जनसुराज पक्षाचे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांचे मंत्रिपद निश्चित आहे. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना महायुतीकडून पाठिंबा देण्यात आला होता. चंदगडमध्ये निवडून आलेल्या अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी सुद्धा भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामधून भाजप आणि शिंदे गटाकडून कोणाला मंत्रीपदाची संधी दिली जाणार याीच उत्सुकता सर्वाधिक लागून राहिली आहे. 


प्रकाश आबिटकरांना दिलेला शब्द पूर्ण होणार?


मंत्रीपदांमध्ये शिंदे गटाकडून प्रकाश आबिटकर यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येच तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शब्द देण्यात आला होता. त्यामुळे प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद मिळणार का? याची उत्सुकता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाकडून नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि प्रकाश आबिटकर यांची नावे चर्चेत आहेत. करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी सुद्धा जोडण्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे या तिघांपैकी कोणाला संधी दिली जाणार याकडे लक्ष आहे.


प्रकाश आबिटकर यांची राधानगरीत हॅट्ट्रिक 


दुसरीकडे प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. आजपर्यंत कोणत्याही आमदाराला राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदारकीची हॅट्रिक करता आलेली नाही. मात्र आबिटकर यांनी ती किमया साधली आहे. मतदारसंघामद्येही विकास कामांमधून त्यांनी दुर्गम वस्त्यांवरही रस्ते पोहोचवले आहेत. गारगोटीमध्ये पोलीस स्टेशन, प्रांत कार्यालय, सरकारी रुग्णालय अशा विविध इमारती उभा करून मतदारसंघांमधील नागरिकांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रकाश आंबिटकर पुन्हा एकदा निवडून आल्याने एकनाथ शिंदे दिलेला शब्द पूर्ण करतात का? याकडे लक्ष असेल. 


काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?


एकनाथ शिंदे यांनी राधानगरी मतदारसंघात प्रचार सभेत बोलताना प्रकाश आबिटकर यांच्या मंत्रिपदाचे सुतोवाच केले होते. शिंदे म्हणाले होते की, आमचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, तर तो (प्रकाश आबिटकर) मंत्री झाला असता. त्यांचा बॅकलाॅग आता भरून काढणार आहे. तुमचा माणूस अनेक वर्ष काम करत आहे. त्यांच्या कामाची पोचपावती हा एकनाथ शिंदे देणार.  


इतर महत्वाच्या बातम्या