कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur Loksabha) महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या प्रचारार्थ उद्या (27 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापुरातील (Kolhapur) तपोवन मैदानात उद्या सायंकाळी साडेचार वाजता ही सभा होणार आहे. या सभेसाठी महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार तयारी सुरु आहे.


महापालिकेने येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून पुसून काढला!   


या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेकडून (Kolhapur Municipal Corporation) पीएम मोदी येणाऱ्या मार्गावर झाडून पडून स्वच्छता करण्यात आली. पीएम मोदी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर विमानतळावरून तपोवन मैदानाच्या दिशेने जाणार आहेत. यामधील विमानतळावरून मार्गस्थ झाल्याने ते शिवाजी विद्यापीठ रोड सायबर चौक पुढे एसएससी बोर्ड ते पुढे हाॅकी स्टेडियम ते संभाजीनगर मार्गावरून तपोवन मैदानात दाखल होतील. त्या मार्गावर कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून तातडीने स्वच्छता करण्यात आली. तपोवन मैदानातून निर्माण चौकाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावरही आज (26 एप्रिल) डागडूजी सुरु होती. या मार्गावरून तपोवन मैदानातून विमानतळाकडे जाता येते. त्यामुळे नेत्यांच्या दौऱ्यात रस्त्यांची डागडूजी हा कोल्हापूर मनपाच प्राधान्यक्रम नेहमीच दिसून आला आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोल्हापूर दौरा कसा असेल?


उद्या सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूर विमानतळावर पोहचतील. सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी तपोवन याठिकाणी सभेला उपस्थित राहणार आहेत. यानंतर सभा पार पडल्यानंतर सायंकाळी 6.20 वाजता तपोवन मैदानावरून कोल्हापूर विमानतळाकडे रवाना होतील. त्यानंतर 6.30 वाजता कोल्हापुरातून मुंबईकडे रवाना होणार आहेत. 


दरम्यान, अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे. अधिकाऱ्यांनी विमानतळापासून तपोवनकडे पोहोचणारा मार्ग आणि तपोवन मैदानाची पाहणी केली आहे. काल गुरुवारीच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्त्वाच्या ठिकाणी आजपासून बंदोबस्त तैनात होणार आहे. सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीनंतर नेते, कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी आणि सभेच्या येणाऱ्या नागरिकांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळापासून ते तपोवन मैदानापर्यंत पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांसह, राज्य राखीव पोलिस, जिल्हा पोलिस, होमगार्ड तैनात केले जाणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या