Hasan Mushrif: शासन आपल्या दारी कार्यक्रमातून आपल्या मंत्रिपदाचे आणि राजकीय कुस बदलण्याचे स्पष्ट संकेत दिलेल्या हसन मुश्रीफ यांनी आता मंत्री झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात आत नवीन राजकीय समीकरणांची नांदी केली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुश्रीफ यांचे आज कोल्हापुरात (Kolhapur news) आगमन होत असतानाच ताराराणी चौकात लावण्यात आलेल्या दोन पोस्टर्सनी चांगलेच लक्ष वेधले आहे. यामध्ये मुश्रीफांची राजकीय पलटी आणि कागलमधील त्यांचे कट्टर राजकीय विरोधक भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पोस्टर्सवर निष्ठा शब्द ठळकपणे झळकत आहे, तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभेच्छांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने लावलेल्या होर्डिंगवरून काँग्रेस संचालकांचे फोटो गायब झाले आहेत. त्यामुळे राजकीय कुस बदलत असताना स्थानिक राजकारणातही तोच कित्ता गिरवणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष स्वत: हसन मुश्रीफ आहेत, असे असतानाही जिल्हा बँकेकडून मुश्रीफांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, पी. एन. पाटील यांच्यासह शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे फोटोही टाळले आहेत. त्यामुळे मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने ताराराणी चौकात लावलेल्या होर्डिंगची जोरदार चर्चा रंगली आहे.
ताराराणी चौकात ज्या ठिकाणी हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्ज लागले आहेत. अगदी त्याच होर्डिंग्जच्या वर 'राजे साहेब आमचे आमदार' अशा पद्धतीचे होर्डिंग्ज लावला आहे. भाजपच्या या होर्डिंगवर निष्ठा हा शब्द ठळक अक्षराने दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या होडिंग्जमधून कागलच्या राजकीय संघर्षाचे संकेत मिळत असले, तरी जिल्ह्यातही ही वेगळ्या समीकरणाची तर नांदी नाही ना? असा सूर उमटू लागला आहे.
ज्या 'महाशक्ती'ने प्रचंड त्रास दिला, त्यांच्याच मांडीला मांडी
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत सावलीप्रमाणे असलेल्या कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांच्या वळचणीला गेल्याने राजकीय भूवया उंचावल्या. ईडीच्या चौकशीने हैराण झालेल्या हसन मुश्रीफ यांनी राजकीय अगतिकतेतून पलटी मारली, तरी त्यांनी घेतलेल्या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यात नाराजी आहे. आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या नेत्यांना आतापर्यंत पक्षाकडून देण्यात आलेल्या सन्मानाचा पाढा वाचत आहेत. आज त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या हसन मुश्रीफ यांना थेट सवाल केला आहे.
वारसा कसा विसरलात?
दुसरीकडे, रोहित पवार यांनी आज ट्वीट करून हसन मुश्रीफ अजून काय पाहिजे? अशी विचारणा करत नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, मुश्रीफ साहेब... आदरणीय पवार साहेबांची साथ-मार्गदर्शन आणि आपली मेहनत याच्या बळावर आपण कोल्हापूरमध्ये सर्वांना सोबत घेऊन सर्वधर्म समभाव जोपासत काम करत होतात. पण ज्या 'महाशक्ती'ने त्यांच्या ताब्यातील यंत्रणांचा गैरवापर करत तुम्हाला प्रचंड त्रास दिला. धार्मिक सलोखा उद्धस्त करुन तेढ निर्माण करायची आणि सत्ता मिळवायची, हेच ज्यांचं धोरण आहे. अशा शक्तीच्या मांडीला मांडी लावून तुमच्यासारखी व्यक्ती जाऊन बसते तेव्हा कोल्हापूरकरांचा आणि राजर्षी शाहू महाराजांचा वैचारीक वारसा आपण कसा विसरलात, असा प्रश्न पडतो.
इतर महत्वाच्या बातम्या :